1. बातम्या

Rabbi Jowar : कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे वाण

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन २०२३ पर्यंत ज्वारीचे विविध २५ वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे.राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rabbi Jowar update

Rabbi Jowar update

डॉ. आदिनाथ ताकटे

दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते.तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची असते.त्याकरिता योग्य ज्वारीच्या वाणांची उपलब्धता करणे अत्यंत आवश्यक आहे.या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जमिनीच्या खोलीनुसार, ज्वारीचे विविध वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन २०२३ पर्यंत ज्वारीचे विविध २५ वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे.राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात रब्बी ज्वारी खाली सन २०२०-२१ मध्ये १६.६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामध्ये २३ टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, ४८ टक्के मध्यम तर २९ टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला १७.४ लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले.

राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विकसित वाणाखाली आहे. यामध्ये फुले रेवती खाली १५ टक्के, फुले वसुधा खाली १० टक्के ,फुले सुचित्रा १० टक्के ,फुले अनुराधा ५ टक्के मालदांडी व इतर स्थानिक वाणाखाली ६० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे.महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जरी ज्वारीची लागवड ही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली असली तरी राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमी पासून पेरणीला सुरुवात होते.

काही शेतकरी १५ सप्टेंबर नंतर पेरणीला सुरुवात करतात.तर काही शेतकरी हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर पेरणी करतात. विविध भागातील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्या नुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी ज्वारीच्या वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची.त्याकरिता प्रस्तुत लेखात कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण व त्यांची वैशिष्टे या बाबत माहिती दिली आहे.

जमिनीच्या खोलीनुसार  कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण :
१. हलकी जमिन   ( खोली ३० से.मी)- फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती 
२. मध्यम जमिन    (खोली ६० से.मी)- फुले सुचित्रा, फुले माऊली,परभणी मोती,मालदांडी ३५-१,
३. भारी जमिन    (६० से.मी पेक्षा जास्त)- सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही२२, पी.कें.व्ही.क्रांती, परभणी मोती, फुले पूर्वा  संकरित वाण:सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९
४. बागायतीसाठी - फुले रेवती, फुले वसुधा,सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९
५. हुरड्यासाठी- फुले उत्तरा,फुले मधुर
६. लाह्यांसाठी- फुले पंचमी
७. पापडासाठी- फुले रोहिणी
फुले यशोमती  ( प्रसारण वर्ष :२०२२ )
• पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनी करीता कोरडवाहू खाली फुले अनुराधा ऐवजी प्रसारित
धान्य उत्पादन -९.२ क्विं./हे. 
चारा  उत्पादन -४२.६  क्विं./हे.
शूभ्र पांढऱ्या आकाराचे गोलाकार दाणे
पक्वता कालावधी -११२ ते ११५ दिवस 
पश्चिम महाराष्ट्रातील जिरायत क्षेत्रातील उथळ जमिनी साठी शिफारस  
फुले अनुराधा
* कोरडवाहू क्षेत्रासाठी,हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस.
अवर्षणास प्रतिकारक्षम
भाकरी उत्कृष्ट,चवदार
कडबा अधिक पौष्टीक व पाचक 
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ८-१० क्विं. व कडबा ३० -३५ क्विं
फुले माऊली
* हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य 
पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस 
भाकरीची चव उत्तम
कडबा पौष्टीक व चवदार 
धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी ७-८ क्विं. व कडबा २०-३० क्विं.
धान्याचे उत्पादन मध्यम  जमिनीत हेक्टरी १५-२० क्विं. व कडबा ४०-५० क्विं.
फुले सुचित्रा
*मध्यम जमिनीसाठी शिफारस
पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस 
उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत 
धान्य उत्पादन २४-२८ क्विंटल व कडबा ६०-६५ क्विंटल
फुले वसुधा
*भारी जमिनिकारिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस 
पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस 
दाणे मोत्यासारखे,पांढरेशुभ्र चमकदार
भाकरीची चव उत्तम
ताटे भरीव,रसदार व गोड
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी २४-२८ क्विं. व कडबा ६५-७० क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ३०-३५ क्विं. व कडबा ७०-७५ क्विं.

 

फुले यशोदा 
* भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित 
पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२५  दिवस 
दाणे मोत्यासारखे,पांढरेशुभ्र चमकदार,भाकरीची चव चांगली 
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी २५-२८ क्विं./हे. व कडबा ६०-६५ क्विं./हे.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ३०-३५ क्विं./हे. व कडबा ७०-८० क्विं./हे.
फुले पूर्वा ( आर एस व्ही २३७१) ( प्रसारण वर्ष २०२३)
• पाण्याचा ताण सहन करणारा 
महाराष्टार्तील जिरायत भागातील खोल काळ्या जमिनीसाठी शिफारशीत 
कालावधी ११८ ते१२० दिवस 
पांढरे शुभ्र टपोरे व गोलाकार दाणे 
न लोळणारा ,काढणीस सुलभ 
धान्य उत्पादन -२३.७ क्विं./हे. व कडबा ७०-८० क्विं./हे.
सी एस व्ही.२२
* भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस
पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२०  दिवस 
दाणे मोत्यासारखे चमकदार,भाकरीची चव चांगली
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी २४-२८ क्विं. व कडबा ६५-७० क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ३०-३५ क्विं. व कडबा ७०-८० क्विं
परभणी मोती
* भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस
पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस 
दाणे मोत्यासारखे,पांढरेशुभ्र चमकदार,
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी १७ क्विं. व कडबा ५०-६० क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ३२ क्विं. व कडबा ६०-७० क्विं.
फुले रेवती
* भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस 
पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस 
दाणे मोत्यासारखे,पांढरे चमकदार,
भाकरीची चव उत्कृष्ट 
कडबा पौष्टीक व अधिक पाचक 
धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ४०-४५ क्विं. व कडबा ९०-१०० क्विं.
मालदांडी ३५-१
*मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस 
पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस 
दाणे चमकदार,पांढरे
भाकरीची चव चांगली
खोडमाशी प्रतिकारक्षम
धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी १५-१८ क्विं. व कडबा ६० क्विं. 
फुले उत्तरा
* हुरड्यासाठी शिफारस
*हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस 
भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात 
*सरासरी  ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
हुरडा चवीस सरस अत्यंत गोड,शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात. 
फुले मधुर 
* हुरड्यासाठी शिफारस
हुरड्याची अवस्था येण्यास ९३-९८ दिवस लागतात 
वाण उंच असून पालेदार आहे.  
हुरडा अवस्थेत  दाणे सहज सुटण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा मिळतो.
या वाणा पासून ३०-३५ क्विं /हेक्टर हुरड्याचे उत्पादन मिळते 
सदर वाणाची शिफारस ही फुले उत्तर ह्या वाणा ऐवजी प्रसारित केली आहे
फुले पंचमी 
* लाह्याचे प्रमाण ( वजनानुसार ) ८७.४ टक्के 
लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित
गतवर्षी ज्वारीच्या क्षेत्रात घट मात्र उत्पादनात वाढ ,मागणीमुळे दर चढेच राहणार

महाराष्ट्र हे ज्वारी पिकवणारे महत्वाचे राज्य, त्याच बरोबर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये चारा पीक म्हणून ज्वारीची लागवड केली जाते. राज्यात खरीप आणि रब्बी ज्वारीचे ६० लाख हेक्टर क्षेत्र होते.,परंतु वातावरणातील बदलामुळे आणि सिचंनाची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी ऊस,डाळिंब,द्राक्षे,भाजीपाला पिकांकडे वळली आहेत. राज्यात नगर ,पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हे ज्वारी लागवडीत आघाडीवर आहेत.त्याच बरोबर काही प्रमाणात मराठवाडा ,विदर्भात ज्वारीची लागवड वाढली आहे.

गेल्या काही वर्षापासून रब्बी हंगामातील ज्वारीच्या क्षेत्रात सात्यत्याने घट होत आहे. राज्यात रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी ५० लाख हेक्टर आहे. २०२२-२३ च्या रब्बी हंगामात ८० हजार हेक्टरने रब्बी क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ५१ लाख ६७ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तरीही रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घटीचा कल कायम दिसून आला. राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ३६ हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. २०११ मध्ये राज्यात सुमारे ३० लाख हेक्टरवर रब्बी व १० लाख हेक्टरवर खरीप हंगामात ज्वारी घेतली जात होती.

ज्वारीच्या क्षेत्रात घट का?
गेल्या काही वर्षापासून सातत्याने होणारे हवामानातील बदल,जून महिन्यात अपेक्षित पाऊस न होणे,त्यामुळे जुलैअखेर पर्यंत खरीपाच्या पेरण्या होतात आणि त्यामुळे खरीपातील पिकांची काढणी नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरु असते.त्यानंतर शेतकऱ्यांना मशागतीस उशीर होतो आणि ज्वारी पेरण्यास विलंब होतो.त्यामुळे बहुतेक शेतकरी पेरणी टाळतात.जे शेतकरी पेरणी करतात त्यांना काढणीस उशीर मे उजाडतो. ज्वारीला थंडी जास्त पोषक असते. तापमानात वाढ झाली कि अपेक्षित उत्पन्न निघत नाही.

मागील काही वर्षापासून बदलत्या हवामाना मुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळाच्या झळा जाणवत आहे.त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. शिवाय काढणीला आलेली ज्वारी अनेकदा मार्च-एप्रिल मधील वादळी पावसात सापडते.त्यामुळे शेतकरी ज्वारीची पेरणी टाळतात. शिवाय बहुतांश ज्वारीही कोरडवाहू /अवर्षणप्रवण क्षेत्रात घेतली जाते. अवर्षण क्षेत्रात सिंचन सुविधा वाढल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पिके,ऊस, द्राक्षे, डाळिंब, पालेभाज्याकडे आहे.ज्वारीची पेरणीपासून काढणी पर्यंतची कामे अद्यापही पारंपारिक पद्धतीने मजुरांकडून केली जातात ,मजुरीचा वाढलेला खर्च अपेक्षित उत्पादन न निघणे आणि पोषक हवामानाचा अभाव यामुळे शेतकरी ज्वारीची पेरणी करण्यास धजावत नाहीत.

आरोग्यदृष्ट्या ज्वारी पिकाला संधी!
गेल्या दोन दशकापासून देशातील नागरिकांचे राहणीमान तसेच खाद्य पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल झाले आहे.महाराष्ट्रीय लोकांच्या जेवणामध्ये मध्यतंरी गहू,तांदळाचा वापर वाढला होता. चौरस आहार कमी झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला.मधुमेह, रक्तदाब, ह्द्यविकार, लठ्ठपणा, त्वचेच्या आजाराचे प्रमाण वाढले.त्यावर उत्तर म्हणजे ज्वारी होय. ज्वारीमध्ये स्टार्चचे हळू प्रमाणात विघटीत होतात,त्यामुळे माणसामध्ये दिसणारे आजार कमी होण्यासाठी ज्वारीचे पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण चांगले आहे.

स्फुरद,लोह,कॅल्शियमसारखे घटक तसेच थायमिन,रीबोपेल्विन,नायसीन ही जीवनसत्वे आहेत.त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी असलीच पाहिजे.ज्वारीच्या बरोबरचे बाजरी,नाचणी,सावं,रागी यांचाही वापर खाद्य पदार्थांमध्ये महत्वाचा ठरणार आहे.
यंदा राज्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

राज्यातील शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम जवळपास गेलाच आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाच्या आशेवर आहेत. राज्यात सोलापूर, अहमदनगर ,पुणे आणि सातारा जिल्ह्यात गोकुळअष्टमी नंतर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात होते.यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्यांना तब्बल महिन्याभर उशिराने झाल्या,परिणामी बहुतांश भागात अद्याप शेतात खरीपाची पिके आहेत. मूग,उडीद आता काढणीला आलेले आहेत.महिन्य भरात बाजरी काढणीला येईल.त्यानंतर परतीच्या पावसाने साथ दिली तर रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होईल.

राज्यात राहुरीच्या कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी राज्यात उत्पादनाची क्रांती- राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन २०२३ पर्यंत ज्वारीचे विविध २५ वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे.राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात रब्बी ज्वारी खाली सन २०२०-२१ मध्ये १६.६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामध्ये २३ टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, ४८ टक्के मध्यम तर २९ टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला १७.४ लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले. राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विकसित वाणाखाली आहे. यामध्ये फुले रेवती खाली १५ टक्के, फुले वसुधा खाली १० टक्के ,फुले सुचित्रा १० टक्के ,फुले अनुराधा ५ टक्के मालदांडी व इतर स्थानिक वाणाखाली ६० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे.

सन २०११-१२ पासून म्हणजेच मागील १० वर्षाचा विचार करता राज्याची ज्वारी उत्पादकता ९१ टक्क्यांनी वाढली आहे.ज्वारी उत्पादन ३१ टक्क्यांनी वाढले असून रब्बी ज्वारी खालील क्षेत्र ४३ टक्क्यांनी कमी झाले आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होऊन देखील उत्पादन वाढले आहे.ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी वाणांचा व व पंचसूत्री तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचे संशोधन केलेले आहे. त्यामध्ये हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा ,फुले माउली,मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा तर भारी जमिनीसाठी फुले वसुधा ,बागायती साठी फुले रेवती तर ज्वारीच्या इतर उपयोगासाठी म्हणजेच हुरडया साठी फुले मधुर ,लाह्यांसाठी फुले पंचमी व पापड बनविण्यासाठी फुले रोहिणी या वाणांचे संशोधन केले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे वाण आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीत विक्रमी उत्पादन घेता येईल. फुले रेवती हा वाण बागायती क्षेत्रामध्ये खताना चांगला प्रतिसाद देतो. ज्वारीवर येणाऱ्या खोड माशी व खडखड्या यासारख्या कीड व रोगांना प्रतिकारक्षम वाण आहे. फुले रेवती वनाच्या भाकरी व कडब्याची चव मालदांडी सारख्या वाणाप्रमाणे असल्यामुळे हा वाण शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय लोकप्रिय झालेला आहे.

कोरडवाहू रब्बीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी.शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे.योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो.पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी.त्यासाठी १ किलो बियाण्यास ३०० मेष गंधकाची ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.त्यामुळे कानी हा रोग येत नाही.
गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.

ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ x १५ से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे.बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ x १२ से. मी. अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० से.मी ठेवावे.पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र,स्फुरद व पालाश दयावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो.९४०४०३२३८

English Summary: Rabi Sorghum Varieties for Dryland and Horticultural Areas rabbi season update Published on: 22 September 2023, 01:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters