खरीप हंगामात सुरू झालेली संकटांची मालिका निदान रब्बी हंगामात तरी पूर्णविराम लावेल अशी शेतकर्यांची आशा होती, मात्र शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरताना दिसत आहे. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी बरसणार असल्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक कायम आहे. खरीप हंगामात अवकाळी नामक ग्रहणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, खरीप हंगामातील अनेक मुख्य पीक जास्तीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या हातातुन गेलेत. खरीप हंगामात अवकाळी पाऊस व त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी राजांच्या पदरी कवडीमोल उत्पन्न पडले होते.
खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी या अनुषंगाने शेतकरी राजांनी रब्बी हंगामात हजारोंचा खर्च करून पिकांची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील पिके सध्या जोमदार वाढीला आली आहेत, मात्र अशातच भारतीय हवामान खात्याचा अवकाळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवण्यास पुरेसा आहे. रब्बी हंगामातील पिके ऐन वाढीच्या अवस्थेत येत्या काही दिवसात जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसात अवकाळी काळ बनून बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. खरीप हंगामात तसेच आता रब्बी हंगामातही वारंवार येणाऱ्या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे, त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज प्रकाशित होताच शेतकऱ्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात उद्या आणि परवा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्या द्वारे सांगितला गेला आहे. 19 आणि 20 तारखेला येऊ घातलेल्या या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.
दुष्काळासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सध्या अवकाळीने त्राहिमाम् घातला आहे, या विभागातील परभणी, बीड, नांदेड आणि लातुर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मराठवाड्या प्रमाणेच विदर्भात देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस काळ बनून येणार असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भात पावसाचा एवढा जोर नसणार मात्र असे असले तरी, बेमोसमी पाऊस पिकांसाठी घातक होऊ शकतो असे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जात आहे.
एकंदरीत भारतीय हवामान खात्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भातील बळीराजासाठी धोक्याची घंटी ठरत आहे. आधीच अवकाळी मुळे विदर्भ, मराठवाडासमवेतच संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान नमूद करण्यात आले आहे आणि जर पुन्हा उद्या आणि परवा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि शेतकरी राजा पुन्हा एकदा बेजार होऊ शकतो.
Share your comments