राज्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड केली जात असते. रब्बी हंगामातील हरभरानुकताच बाजारपेठेत दाखल झाला आहे. हरभऱ्याचा श्रीगणेशा झाला खरी मात्र हरभऱ्याला मिळत असलेला दर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशा घेऊन आला आहे. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पिकाला चांगली झळाळी मिळत असल्याने आतापर्यंत खरीप हंगामातील हे दोन्ही पिके बाजारपेठेत मोठ्या चर्चेत राहिली आहेत. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना देखील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला चांगला बाजार भाव मिळण्याची आशा आहे, मात्र नुकताच हरभरा बाजारपेठेत चमकू लागला आहे आणि तूर्तास हरभऱ्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने हरभरा उत्पादक शेतकरी एवढे प्रसन्न बघायला मिळत नाहीत.
रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी लवकर हरभरा पेरणी केली होती, तोच हरभरा सध्या बाजारात बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी हंगामाच्या सुरुवातीलाच अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बाजारपेठेत हरभऱ्याला साडे चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे दर देखील बऱ्याच दिवसापासून स्थिर होते आता त्यात मामुली बढत नोंदवली जात आहे. लातूरच्या बाजारपेठेत शुक्रवारी सोयाबीन पिकांना 6 हजार 400 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. व्यापाऱ्यांच्या मते, आता हळूहळू रब्बी हंगामातील पिकांची बाजारपेठेत आवक दिसू लागली आहे. रब्बी हंगामातील हरभरा आता बाजारात येऊ लागला आहे. हंगामाची सुरुवात जरी असली तरी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हरभऱ्याची रोजाना पंधरा हजार पोती आवक होत असल्याचे समजत आहे. मात्र हरभऱ्याला अपेक्षित दर मिळत नाहीये, सध्या हरभरा 4500 रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी शासनाने पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव लावून दिला आहे. मात्र खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा खूप कमी किमतीत हरबऱ्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना लवकरच हमीभाव केंद्र सुरू व्हावे अशी आशा आहे.
तसं बघता रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू हे दोन पिक मुख्य पीक म्हणून ओळखले जातात, मात्र उत्पादन वाढीच्या अनुषंगाने या रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी अल्पकालावधीत काढणीसाठी येणाऱ्या आणि हमीचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा पिकाच्या लागवडीस पसंती दर्शवली आहे. ज्वारी आणि गव्हाची लागवड या रब्बी हंगामात कमी झाली असून हरभऱ्याची लागवड विक्रमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हरभऱ्याची लागवड बघता सुरुवातीला ज्या प्रमाणे रेकॉर्ड तोड आवक नमूद करण्यात येत आहे त्याचप्रमाणे हंगामभर अशीच आवक कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. जर आगामी काही दिवसात हरभऱ्याची आवक वाढली तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून हरभऱ्याचे दर अजून कमी होतील अशी शेतकऱ्यांना अशंका आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र लवकर सुरू होण्याची शेतकऱ्यांची इच्छा आहे.
राज्यात सध्या तुरीसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत मात्र हमीभाव केंद्रात आणि खुल्या बाजारात बाजार भाव एक समानच भासत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राची पायपीट करण्यापेक्षा आणि नाहक कागदपत्रांची पूर्तता करण्यापेक्षा खुल्या बाजारपेठेला पसंती दर्शवली आहे. तुरीचे हमीभाव केंद्र सुरू होण्याआधी तुरीला अपेक्षित असा दर मिळत नव्हता मात्र जेव्हा पासून अभिमान केंद्रे प्रत्यक्षरीत्या खरेदीसाठी उघडली गेली तेव्हापासून तुरीला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अशीच आशा आहे, जर हरभरा साठी देखील हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली तर कदाचित खुल्या बाजारपेठेत देखील हरभऱ्याचे दर वधारू शकतात.
Share your comments