मुंबई: राज्यातील दुधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून, दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्र, या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून भेसळ करणाऱ्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दुधातील भेसळ रोखण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित विविध कंपन्यांच्या सादरीकरणाप्रसंगी श्री. केदार बोलत होते.
दुधातील गुणवत्ता, दर्जा राखण्याकरिता शेतकरी दूध काढण्यासाठी हात मोजे वापरतो किंवा नाही. दूध काढण्याचे भांडे, दूध संकलन केंद्राच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. दूध संकलन केंद्र आणि दुधाची प्रक्रिया करण्यात येणाऱ्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार, असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
दुधातील भेसळ रोखल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे.तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम दिसणार आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, ‘भेसळमुक्त राज्य’ करणार असल्याचेही श्री. केदार यांनी सांगितले. यावेळी डी एन व्ही-जी एल आणि आय आर क्यू एस या कंपनीने दुधातील भेसळ आणि दुधाचा दर्जा राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो याचे सादरीकरण केले.
Share your comments