शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण या गोष्टींचा सामना करावा लागतो. शेतात पिकवलेल्या मालाला रास्त भाव मिळाला नाहीतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. याशिवाय शेतकऱ्यांकडे नगदी चलन नसल्यामुळे शेतकरी वेळेवर पेरणीची कामे करु शकत नाही, अशा समस्या सोडविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेकार आहे. या कार्डमुळे शेतकरी आपल्याला आवश्यक शेतीच्या वस्तू खरेदी करु शकतो. शेतीची अवजारे असो , किंवा खते या कार्डच्या मदतीने शेतकरी खरेदी करत असतो.
बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडे रोकड पैसा नसतो, तेव्हा शेतकरी सावकारांकडून मोठ्या व्याजदरावर पैसे घेत असतात, यामुळे त्यामुळे बळीराजा कर्जबाजारीपणाकडे ओढला जातो. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डची योजना सुरु केली. दरम्यान केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी अनेक ऑफर दिल्या जात आहेत. या कार्डच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विना व्याज दरात कर्जही उपलब्ध करुन दिले जात आहे.
दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी विविध राज्यातील कृषिमंत्री व संबंधित विभागाच्या महत्त्वाच्या घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये श्री.भुसे हे मालेगाव येथून सहभागी झाले होते. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी अशी मागणी केली की, किसान क्रेडिट कार्डचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांची मागणी असताना अनेकांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. तसेच सध्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 3 लाखांवर जे 4 टक्के व्याज आकारले जात आहे, ते माफ करून बिनव्याजी कर्ज यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. बियाणे,खते खरेदी व शेतीसाठी लागणारे भांडवल यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते पण ते वेळेवर झाले पाहिजे.
जर सरकारने पत मर्यादा ठरवून दिली; तर शेतकरी गरजेनुसार त्या पैशाचा वापर करेल. यासह पुन्हा ही खात्यात जमा करणे अशा बाबी त्यास सोयीस्कर होतील असे त्यांनी सांगितले. तसेच किती किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले,हा मुद्दा या वेळी त्यांनी उपस्थित केला. दरम्यान बँकांकडून किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज -
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ३ फोटो लागतील. जर तुम्हाला १ लाखापर्यंतचं कर्ज हवं तर गॅरेंटरची गरज नाही. पण, १ लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला गॅरेंटर लागेल. एक गोष्ट लक्ष ठेवा प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी असते. या किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता. शिवाय एका वर्षात कर्जाची परतफेड केली तर ३ टक्क्यांची सूट मिळते. ५ वर्षात ३ लाखापर्यंत आत्पकालिन कर्ज घेऊ शकतात.
कोणत्या बँकामध्ये मिळते किसान क्रेडिट कार्ड
एनपीसीआय नॅशनल पेमेंट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया रुपये किसान क्रेडिट कार्ड ऑफर करते. यासह नाबार्ड सोप्या अटींवरती कर्ज देते. एसबीआय, बॅक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय मधूनही किसान क्रेडिट कार्ड मिळते.
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड
आयसीआयसीआय बँक, याशिवाय जवळच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल. जर आपण प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला त्वरीत कार्ड मिळेल.
Share your comments