1. बातम्या

बचत गटांना जनावरांसाठी चारा डेपो देणार

KJ Staff
KJ Staff


लातूर: 
राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या भागातील जनावरांसाठी लागणारा चारा डेपो महिला बचत गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली. लोदगा ता. औसा येथील पशु सर्वरोग निदान शिबीर व पशुसंवर्धन दवाखाना उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कन्हेरी मठ कोल्हापूर येथील काडसिध्देश्वर स्वामी, परभणी येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मार्कंडेय आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर म्हणाले की, राज्यात यापुढे जलयुक्तशिवार सारखीच चारायुक्त शिवार योजना चालू करण्यात येत आहे. आपले गाव सुजलाम-सुफलाम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गटशेती करावी व दुग्धविकास कार्यक्रम राबवावा. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही. पशुसंवर्धन विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. राज्यात शासनाने पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला असल्याने शेतकरी वर्गाने घाबरुन जाण्याचे काम नाही. शेती व्यवसायाबरोबरच दुग्धव्यवसायाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.

लोदगा ता. औसा येथील पशुसंवर्धन चिकित्सालय हे आठवड्यातून तीन दिवस चालू राहणार असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल या दवाखान्यामुळे या भागातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी वर्गाने आपल्या पशुधनास वेळेवर उपचार करून घ्यावेत यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. जानकर यांनी दिली. यावेळी डॉ. सुरेश गंगावणे लिखित 'आपण दुग्ध व्यवसाईक' या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री महादेव जानकर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters