सध्या रब्बी हंगाम सुरू झालेला आहे.रब्बी हंगाम शेतकरी प्रामुख्याने मका, कांदा,लसूण आणि विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. रब्बी हंगामामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे वाटाणा हे महत्त्वपूर्ण पिक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात.वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मेग्निशियम हि खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
साधारणत:या पिकाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस केली जाते. काही ठिकाणी पिकाला शेंगा लागायला देखील सुरुवात झाली असेल. नोव्हेंबर महिन्यात नाही तर ज्या भागांमध्ये मार्च महिन्यात थंड वातावरण व सरासरी तापमान दहा ते वीस अंश सेल्सिअस राहते, अशा ठिकाणी देखील मार्चपर्यंत लागवड करता येऊ शकते. त्या कालावधीनुसारच नियोजन करणे गरजेचे असते.
वाटाणा लागवडीसाठी घ्यायची काळजी -
या पिकाच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारी जमिन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी आणि रेती मिश्रित जमिन या पिकासाठी खूप चांगली असते.तसेच जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा. वाटाणा पिकाची लागवड करण्याआधी जी काही पूर्व मशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करून मगच लागवड करावी.
वाटाणा पिकाला खत व्यवस्थापन करताना एका हेक्टरला पंधरा ते वीस टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. तसेच हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद आणि 30 ते 40 किलो पालाश देणे गरजेचे असते.
सुधारित जाती -
अरकेल - या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणत: त्यांची लांबी 6 ते ७ सेंमी. लांबीच्या असते. ५० ते ५५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
बोनव्हेला -या शेंगा हिरव्या रंगाच्या असून दाणे अत्यंत गोड असतात. ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
जवाहर – १ -शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.
किड व रोगांचे नियंत्रण -
मावा - हि कीड पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज बनतात.या किडीच्या नियंत्रणासाठी मिथाईल डीमेटोन १o मिलि. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मिली,१o लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
शेंगा पोखरणारी अळी - अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न आणल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी मेल्याथिऑन ५० ईसी, किंवा डेलटामेश्रीन ५ मिलि. १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा निंबोळी अर्क ४ टक्के फवारावे.पेरणीनंतर ३ आठवड्यांनी पहिली फवारणी करावी.
भुरी रोग -या रोगात पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसून येते. नंतर ती रोपाच्या सर्व हिरव्या भागावर जलद पसरते आणि झाडाची उत्पादनक्षमता खालावते. यासाठी मार्फोलीन २५० मिली किंवा पाण्यात मिसळणारे किंवा डिनोकॅप ४० डब्ल्यू पी ५०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रतिहेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. नंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
मर रोग - या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त झाड पिवळे पडून वाळते. पेरणीपूर्वी बियास थायरम हे बुरशीनाशक औषध प्रति किलोस ३ ग्रॅम या प्रमाणात वापरावे.
Share your comments