मुंबई: राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 750 गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता यासाठीच्या योजनांमध्ये लोकसहभाग वाढीसोबतच ग्रामीण विकासासाठी एकत्र येऊन गावात स्थित्यंतर आणले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे फाऊंडेशनच्या नियामक परिषदेची चौथी बैठक झाली.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीपक पारेख, किशोर बियाणी, रोनी स्क्रूवाला, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनेद अहमद आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु झालेला 19 महिन्यांचा हा प्रवास विस्मयकारक आहे. शासन आणि खासगी संस्था एकत्र आल्यास कशा प्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळते. या उपक्रमामध्ये शासनाच्या योजना ग्रामस्थांपर्यंत नेण्यासाठी ग्रामप्रचारक गावात थांबूनच ते नागरिकांपर्यंत पोहोचवितात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन परिवर्तनासाठी त्याचा मोठा उपयोग होतो.
फाऊंडेशनच्या माध्यमातून 385 ग्राम परिवर्तकांनी 22 जिल्ह्यातील 750 गावांमध्ये विकासाचे काम नेण्यासाठी मोलाची मदत केली आहे. 750 गावांच्या परिवर्तनापासून सुरु झालेला हा प्रवास 10 हजार गावांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
सुमारे 18 कॉर्पोरेट भागीदार या अभियानात सहभागी झाले असून ग्रामीण भागात पक्की घरे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शौचालयांची निर्मिती, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, कौशल्य विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील कृषी विभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कृषी मालाला बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाच्या जोडीला खासगी संस्थांनी सोबत यावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. कृषीमालाला योग्य भाव देतानाच पाण्याचा जपून वापर करण्याबाबत जाणीवजागृती करणे काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. स्वच्छता, सर्वांना घरे, पाणीपुरवठा या क्षेत्रात राज्य शासनाचे काम चांगले असून फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले स्थित्यंतर अभिनंदनीय असून त्यात सातत्य ठेवावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी नियामक परिषदेतील सदस्यांनी ग्रामीण भागाचा विकास, कृषिमालाला बाजारपेठेशी जोडणे याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी केले. त्याचबरोबर रायगड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली येथील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामपरिवर्तन कसे झाले याबद्दल सादरीकरण केले.
Share your comments