शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, औषध प्रशासनचे सहआयुक्त एस.बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्न् व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी काही व्यक्ती भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करुन नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी आळा घालावा.
ही उत्पादने तयार होण्याच्या ठिकाणी अचानक छापे टाकून तपासणीसाठी नमुने घ्यावेत. भेसळयुक्त नमुने आढळून आल्यास अशा उत्पादकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई त्वरीत करावी. गूळ उत्पादकांबाबत तक्रारी नुकत्याच आल्या असून त्यानुसार काही उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गूळ उत्पादक तसेच अन्य खाद्यपदार्थ उत्पादकांबरोबर बैठक घेऊन उत्पादनांचा दर्जा राखण्याचे महत्त्व तसेच कायद्यातील तरतुदींची माहिती त्यांना द्यावी. अन्नभेसळीचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणाने (एनपीपीए) औषधांच्या किंमतीबाबत जनजागृतीसाठी मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने औषध प्रशासनाने राज्यभरात विशेष मोहिम हाती घेऊन औषधांच्या किंमती एनपीपीए ने निश्चित केल्यापेक्षा जास्त नाहीत याची खात्री करावी. निश्चित केल्यापेक्षा जास्त किंमती असल्यास उत्पादकांविरुद्ध कारवाई करावी.
एनपीपीएच्या तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनजागृती अभियान राबवावे. या तरतुदी तसेच निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त किमती असल्यास नागरिकांनी कोठे तक्रार करायची याबाबत शासकीय रुग्णालये, शासनाची कार्यालये, औषधांची दुकाने आदी ठिकाणी माहिती फलक, फ्लेक्सच्या माध्यमातून माहिती पोहोचवावी, आदी सूचनाही डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिल्या.
Share your comments