निसर्ग वादळाचा राग ओसरल्यानंतर मॉन्सून सर्व राज्यात पोहचला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, पण विदर्भात मात्र पावसाने उघडीप दिली आहे. आज कोकणातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य पाकिस्तानपासून मणिपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर उत्तर कोकण आणि परिसरावर ३.१ किलोमीटर उंचीवर तसेच मध्य अरबी समुद्रात १.५ ते ७.६ उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे कोकणात जोरदार सरीची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात मुख्यत कोरड्या हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या मते गुरुवारी उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. बलरामपुर, सिर्दाथ नगर, सुल्तानपुर, जौनपुर, अंबेडकरनगर, बहराइच, बस्तीसह काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासात पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वी आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मध्यप्रदेशात धुवांधार पाऊस झाला. भोपाळ शहरात ५० किमी प्रति तास या वेगाने दीड तासात १५ मिमी पाऊस झाला. पाऊस पडल्यानंतर हवेत गारवा आला. गेल्या २४ तासात भोपाळ मध्ये २३ मिमी पाणी पडला आहे.
दरम्यान आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, जिल्ह्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान उत्तरेकडील राज्यांसाठी चिंतेत टाकणारी बाब समोर येत आहे. उत्तरेकडे प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची प्रगती काहीशी रेंगाळली आहे. मंगळवारी मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. मात्र त्यानंतर मॉन्सूनची कोणतीही प्रगती केलेली नाही.
Share your comments