राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनच्या पावसाने उडीप दिली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी तर राज्यातील काही तुरळक भागातही पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकण, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. उत्तर पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टी सक्रीय आहे. या पट्ट्याचा पूर्व भाग उत्तरेकडे सरकणार आहे, तर ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवरील चक्राकार वाऱ्याची स्थिती दक्षिण दिशेकडे झुकणार आहे. यामुळे रेंगाळलेल्या मॉन्सूनची वाटचाल परत व्यवस्थित होण्यास पोषक वातावरण तयार होणार आहे.
पूर्व आणि उत्तर भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील राज्यातही पाऊस वाढणार आहे. येत्या २४ तासात छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, दक्षिण- पूर्वी उत्तरप्रदेश आणि झारखंडच्या काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रच्या किनारपट्टीवर आणि गुजरातच्या काही भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर पश्चिम भारतात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मागील २४ तासात केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, गुजरात, छत्तीसगड, पूर्वी उत्तर प्रदेशाच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments