राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण होत असल्याने आजपासून पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान होत असल्याने जोरदार वारे वाहू लागले आहेत. उन्हाचा चटका कमी होण्यास सुरुवात झाली असली तर विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. पूर्व विदर्भात विजा, मेहगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील बुलडाणा येथे उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून विदर्भासह संपूर्ण देशभरातील उष्ण लाट ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान मे महिन्या संपत आल्याने नागरीकांची उन्हाच्या चटक्यापासून सुटका होणार आहे. लवकरच देशभरात मॉन्सून आपल्या कामाला सुरुवात करेल. हवामान विभागानुसार, केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पूर्ण देशाला व्यापणार आहे. साधरण १ जून ते २ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीपर्यंत मॉन्सून २५ ते ३० जूनला येईल. केरळनंतर मॉन्सून गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, पुर्वेकडील राज्यात पोहोचेल. हवामान विभागाच्या मते १० जूनला मॉन्सून महाराष्ट्र, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, आणि सिक्किममध्ये प्रवेश करेल अशी शक्यता आहे. त्यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, आणि बिहारमध्ये मॉन्सून १५ जूनपर्यंत पोहोचेल. हवामान विभागानुसार, येत्या काही दिवसात धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. यासह छत्तीसगड, कर्नाटकात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Share your comments