सांगोला:- पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड बघायला मिळते, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा तालुका विशेषता डाळिंबासाठी ओळखला जातो. या तालुक्याला डाळींबाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र आता याच तालुक्यातून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक धोक्याची घंटी जोराने वाजू लागली आहे. तसं बघायला गेलं तर, एकेकाळी सांगोला तालुका दुष्काळासाठी जगात कुख्यात होता. असं सांगितलं जायचं की या तालुक्यात कुसळ व्यतिरिक्त काहीच उगायचं नाही मात्र येथील शेतकऱ्यांच्या चौकसबुद्धी मुळे वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा सांगोला तालुका डाळींबाचे आगार म्हणून ओळखला जाऊ लागला.
या तालुक्यात 22 हजार 470 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड बघायला मिळते. परंतु एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आता पिन हॉल बोरर नामक संकट घोंगावत आहे, पिन होल बोरर अर्थात खोड भुंगेरा या किडीमुळे या तालुक्यातील बहुतांश डाळींब बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्याची शान डाळिंब बागा नामशेष होणार की काय असा प्रश्न उभा झाला आहे. तालुक्यातील अनेक डाळिंब बागायतदारांनी तळहातावर असलेल्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या डाळींब बागा उपटल्या आहेत, शेतकऱ्यांच्या मते तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा आता नामशेष झाल्या आहेत.
हेही वाचा:-अरे बापरे! कीटकनाशकात तननाशक घटक म्हणुन द्राक्ष बागा सुकल्या; शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान
पिन होल बोरर किडीमुळे डाळिंब बागायतदार मेटाकुटीला आला असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे. यामुळे तालुक्यातील डाळिंब बागायतदारांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी या किडीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून संबंधित डाळिंब बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील बागायतदार करीत आहेत. सांगोला तालुक्यात 490 मीमी एवढा सरासरी पाऊस पडतो असे जरी आकडेवारी सांगत असली तरीदेखील या तालुक्यात एखाद्या वर्षी भरपूर पाऊस पडतो तर एखाद्या वर्षी भयान दुष्काळ नोंदविला जातो.
अशा दुष्काळी परिस्थितीत येथील डाळिंब बागायतदारांनी विकतचे पाणी घेऊन डाळिंब बागा जोपासल्या आहेत. दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना देखील येथील बागायतदारांनी आपल्या अपार कष्टांच्या जोरावर योग्य नियोजनामुळे आणि लाखो रुपयांच्या खर्चाने गेली अनेक वर्ष डाळिंबाच्या बागा यशस्वीपणे जोपासून त्यातून दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. मात्र, आता परिस्थिती कायापलट झाली आहे पिन होल बोरर या किडीमुळे तालुक्यातील डाळिंब बागा नामशेष होऊ लागल्या आहेत.
हेही वाचा:-दुःखदायी! 'या' ठिकाणी हमालाकडून शेतकरी राजाला मारहाण; कारवाई करणार असं प्रशासनाचे आश्वासन
सांगोला तालुक्यातील डाळिंबांला भौगोलिक नामांकन अर्थात जीआय टॅग देण्यात आला आहे. यामुळेच की काय सांगोला तालुक्याचे डाळिंब आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच मागणी मध्ये असते. या तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे डाळिंब पिकावर अवलंबून असल्याने सध्या या तालुक्यातील शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
पिन होल बोरर या किडीसाठी अजूनही ठोस उपाययोजना उपलब्ध नसल्याने भविष्यात डाळिंबाच्या आगारात डाळिंब शिल्लक राहतील की नाही याची शाश्वती नसल्याचे सांगितले जात आहे. लाखो रुपयांचा खर्च करून जोपासलेल्या डाळींब बागा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील शेतकरी आता डाळिंब बागा उपटून भुसार पिकांकडे वळले आहेत, एकेकाळी तालुक्यात झालेली फळबाग क्रांती आता पुन्हा एकदा नामशेष होत आहे. या भयानक संकटांचा सामना करत डाळिंब बागायतदार पुन्हा उभारी घेईल का? याबाबत मोठी संभ्रमावस्था बघायला मिळत आहे.
हेही वाचा:-Onion Price|| आता 'या' कारणामुळे कांद्याच्या भावात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात
सांगोला तालुक्यात आतापर्यंत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने परप्रांतीय डाळिंब खरेदी-विक्रीसाठी हजेरी लावत असतं. यामुळे तालुक्याचा संपूर्ण कायापालट झाला, उद्योगधंद्याला मोठी उभारी आली होती. मात्र आता डाळिंबाच्या बागा नामशेष होऊ लागल्याने परप्रांतीयांनी माघारी जाण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सांगोला तालुक्यात उभारी घेतलेले उद्योगधंदे पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकतील अशी अशांका वर्तवली जात आहे. म्हणून, सांगोला तालुक्यातील डाळिंब बागायतदारांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून पुन्हा एकदा फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Share your comments