1. बातम्या

शेतीसाठी नियोजनपूर्वक पाणी दिल्यास आर्थिक क्रांती निश्चित

सांगली: ग्रामीण भागात शेतीसाठी नियोजनपूर्वक पाणी दिल्यास त्यातून निश्चित आर्थिक क्रांती होईल. त्यासाठी पाणीपुरवठा संस्था उभारल्या पाहिजेत व त्या चांगल्या रीतीने चालविल्या गेल्या पाहिजेत, असे सांगून चिकुर्डे येथील श्री हनुमान, श्री. विलासराव कोरे, श्री दत्त वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे काम अत्यंत आदर्श असून हा आदर्श अन्य संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


सांगली:
ग्रामीण भागात शेतीसाठी नियोजनपूर्वक पाणी दिल्यास त्यातून निश्चित आर्थिक क्रांती होईल. त्यासाठी पाणीपुरवठा संस्था उभारल्या पाहिजेत व त्या चांगल्या रीतीने चालविल्या गेल्या पाहिजेत, असे सांगून चिकुर्डे येथील श्री हनुमान, श्री. विलासराव कोरे, श्री दत्त वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे काम अत्यंत आदर्श असून हा आदर्श अन्य संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व चिकुर्डे येथील श्री हनुमान, श्री विलासराव कोरे, श्री दत्त वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्था पुरस्कृत पाणीपुरवठा संस्था यांच्या विद्यमाने उभारण्यात आलेल्या वारणा सिंचन-साखर संकुलाचे कोनशिला अनावरण महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री व वारणा सहकारी समुहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हे होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संचालक विश्वनाथ डोईजड, राजाराम बापू दूध संघ इस्लामपूरचे संचालक सोमराज देशमुख, वारणा सहकारी दूध संघाचे संचालक अभिजित पाटील, वाळवा पंचायत समितीच्या सदस्य सुप्रिया भोसले, सरपंच कलम पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील शेतकरी सुखी समृद्ध करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सहकार अधिक मजबूत करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जमिनीचा पोत सुधारणे आवश्यक असल्याचे जाणून राज्यात मोठ्या प्रमाणावर मृदा आरोग्य चाचणी उपक्रम राबविण्यात येत आहे. फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. यापुढे कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षण करतील व आवश्यक त्या सुधारणा सुचवतील.

पाण्याचे ऑडीट करून राज्यातील 16 हजार गावामधून जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतसुद्धा पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष फारसे जाणवत नाही. धरणांचे पाणी कालव्यांच्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधून देण्यात येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात टाळला जात आहे. सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणारी वीज तुलनेने कमी दरात उपलब्ध होत असल्याने सौर ऊर्जा उपक्रमाला चालना देण्यात येत आहे, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जतमध्ये वारणा समुहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

डॉ. विनय कोरे यांनी वारणा नदीवर 5 धरणे वारणा सहकारी कारखान्याच्या वतीने बांधण्यात आल्याचे सांगून वारणा, चिकुर्डे आणि परिसरात आज जी हरित क्रांती दिसते, त्यामागे जुन्या पिढीने केलेले प्रचंड प्रेम व संघर्ष कारणीभूत असून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत ठिबक सिंचनाचा समावेश केल्यास पाण्यामध्ये बचत होऊन आणखी अधिक भागाला पाणी देता येईल व जास्तीत-जास्त शेती सिंचनाखाली आणता येईल. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 72 पाणीपुरवठा संस्था असून या संस्थांना 16 मेगावॅट वीज लागते. जतमध्ये वारणा समुहाची 120 एकर जागा उपलब्ध असून तेथे सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने 5 वर्षाची सबसिडी एकत्र द्यावी. हा प्रकल्प पथदर्शी म्हणून उभा केला जाईल त्यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्यासाहेब कोरे संस्थेचे अध्यक्ष गुंडा बंडगर यांनी केले तर स्वागत विलासराव कोरे वारणा उपसा जलसिंचनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास डोईजड यांनी केले. यावेळी विविध अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: Planned irrigation to agriculture help for economic revolution Published on: 15 February 2019, 08:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters