खरीप हंगामात अवकाळी पावसाच्या त्राहिमामामुळे मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकासमवेतच तूर सोयाबीन कापूस इत्यादी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी मुळे खरिपातील सर्वच पिकांचे उत्पादन कमालीचे घटले असल्याचा अंदाज तज्ञा द्वारे व्यक्त करण्यात आला होता. मात्र असे असले तरी, खरीप हंगामातील लाल कांदा समवेतच तुरीची देखील विक्रमी आवक बाजारपेठेत बघायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची एवढी प्रचंड आवक आली होती की बाजार समितीला दोन दिवस लिलाव बंद करावा लागला होता.
आता काहीशी अशीच परिस्थिती अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या पिकाबाबत बघायला मिळत आहे. नूतन वर्षाच्या सुरुवातीला राज्यात तुरीचा हंगाम सुरू झाला. तुरीचा हंगाम जरी यंदा उशिरा सुरू झाला असला तरी थोड्या हटके अंदाजात सुरू झाला आहे. हटके म्हणण्याचे कारण असे की, हंगामाच्या सुरुवातीलाच अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रचंड प्रमाणात तुरीची आवक झाल्याने बाजार समितीला मोजमापासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे बाजार समितीने तूर उत्पादक शेतकऱ्यांना दोन दिवस तूर विक्रीसाठी बाजारपेठेत घेऊन येऊ नये असे आवाहनच दिले. तसं बघायला गेलं तर तुरीचे पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते या खरिपात देखील आंतरपीक म्हणूनच तुरीची लागवड केली गेली होती मात्र तुरीची लागवड यावेळी वाढल्याचे नमूद करण्यात आले होते. तुरीची लागवड वाढली होती मात्र पिक अंतिम टप्प्यात असताना वातावरणात मोठा बदल झाला आणि त्यामुळे तुरीच्या पीकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव नजरेस पडला आणि त्यामुळे तूर पिकावर विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील तूर पिकावर विपरीत परिणाम झाला आणि उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. मात्र असे असले तरी, किडींचा प्रादुर्भाव होताच राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घेऊन वेळीच यावर उपाययोजना केल्याने होणारे नुकसान टाळले गेले. त्यामुळे यावर्षी अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटल पासून ते सहा क्विंटलपर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळाले असल्याचा दावा देखील केला जात आहे.
कृषी तज्ञांच्या मते, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे तूर काढण्याचे कार्य एकाच वेळी पूर्णत्वास आले त्यामुळे विक्रीसाठी देखील तूर उत्पादक शेतकरी एकाच वेळी गर्दी करताना बघायला मिळत आहेत, त्यामुळे अकोला समवेतच राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची विक्रमी आवक बघायला मिळत आहे. आगामी काही दिवस तुरीची अशीच दर्जेदार आवक बाजारपेठेत बघायला मिळू शकते. तूर उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घटल्याने यावर्षी तुरीला आगामी काही दिवसात विक्रमी बाजार भाव मिळण्याचे आसार आहेत. सध्या तुरीला गुणवत्तेनुसार समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. राज्यात नाफेडने तूर खरेदी सुरू केली आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांना मोठा कुटाणा करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडचे दरवाजे झिझवन्यापेक्षा तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सरळ खुल्या बाजारात विक्रीला पसंती दर्शवली आहे. तुरीला सहा हजार तीनशे रुपये हमीभाव देण्यात आला असला तरी तूर उत्पादक शेतकरी खुल्या बाजारात 5 हजार 900 रुपये क्विंटलपर्यंतच्या मामुली दरावर तुर विक्री करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे खुल्या बाजारात विक्री केली असता तूर उत्पादक शेतकऱ्यांना काटा झाला असता लागलीच पैसे दिले जातात.
खुल्या बाजारातला हा व्यवहार शेतकऱ्यांना विशेष पसंत आहे त्यामुळे सरकारी केंद्र ऐवजी खुल्या बाजारात तूर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे तसेच आगामी काही दिवसात तुरीची आवक अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी तुर विक्री साठी घाई न करण्याचे आवाहन केले आहे. कृषी तज्ञांच्या मते, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांसारख्या प्रमुख तूर उत्पादक राज्यात तुरीचे उत्पादन घटले असल्याने आगामी काही दिवसात, तुरीचे बाजार भाव वाढू शकतात. म्हणून तूर उत्पादक शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करणे फायद्याचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments