
MLA Amol khatal Patil News
मुंबई : संगमनेर बसस्थानक परिसरातील विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील विधानभवनात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. ना. प्रतापजी सरनाईक होते, तसेच आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संबंधित विभागांचे अधिकारीही या बैठकीस हजर होते. बैठकीत संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मा. ना. सरनाईक साहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी या मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शवली.
बैठकीत संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी २२०० चौ. फु. जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मांडण्यात आली. तसेच, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याआधी तात्पुरते शिबिर व ट्रॅक सुरू करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा विनंती यावेळी करण्यात आली.
संगमनेर आगारासाठी २० नवीन बसेस देऊन ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-नाशिक मार्गावरील शिवशाही बससेवेला संगमनेरमध्ये थांबा मिळावा, यासाठीही पाठपुरावा करण्यात आला. तसेच, व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांसाठी ३% गाळे वाटप करण्याच्या मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
संगमनेर बी.ओ.टी. व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्तावही बैठकीत ठेवण्यात आला. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, आमदार अमोल खताळ यांनी या मागण्या लावून धरल्या आहेत तसेच यावर आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. जनतेच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. संगमनेरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला साजेसा विकास व्हावा, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रामाणिकपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी आश्वासन दिले की, हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून संगमनेरच्या जनतेला योग्य सुविधा मिळवून देतील.
Share your comments