मंचर – साधरण एक आठवडा पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर पुन्हा राज्यात सक्रिय होत मॉन्सूनचा पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. राज्यात मॉन्सून दाखल होताच अवघ्या चार दिवसातच पुर्ण राज्य व्यापले होते, त्यानंतर पावसाने काही दिवस दांडी दिली. पण त्यानंतर आता परत सक्रिय झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, पण आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र या जोरदार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तालुक्याच्या पुर्व भागात होणाऱ्या संततधार पावसामुळे येथील टोमॅटो बागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ भागात गणपती मंदीर परिसरात सायंकाळच्या सुमारास तुफान झालेल्या पावसाने खरीप हंगामातील लागवड केलेल्या सुमारे ५० एकर क्षेत्रातील बटाट्याच्या बियाण्याचे नुकसान झाले आहे. लागवड केलेले बटाटे बियाणे जोरदार पावसामुळे वाहून गेले आहे. दुबार बटाटा बियाणे लावण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सातगाव पठार परिसरात खरीप हंगामातील बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मागील तीन ते चार दिवसांपासून सातगाव पठार परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बटाटा लागवड सुरू केली आहे. ही लागवड सुरू असतानाच बुधवारी पारगाव गावातील गावठाणाच्या पूर्वेकडील गणेशनगर परिसरात जोरदार स्वरूपाचा ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला.
तासभर जोरात पडलेल्या या पावसाने लागवड केलेले बटाटे बियाणे अक्षरशः वाहून नेले आहे. अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते, रासायनिक खते घालून ३६ रुपये किलो दराने खरेदी केलेले टाटा बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी जमिनीत लागवड केली होते; परंतु या पावसामुळे अक्षरशः हे बियाणे व खते वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ढगफुटीसारखा झालेल्या पावसामुळे एकरी ६० ते ७० हजार रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरकारच्या वतीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी केली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील टोमॅटो उत्पादकांना संततधार पावसाचा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे टोमॅटो बागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीच्या खर्चात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. टोमॅटोला प्रति कॅरेट प्रतवारीनुसार ३५० रुपये ते ६०० रुपये समाधानकारक बाजारभाव मिळत आहे.
लाखणगांव, देवगांव, काठापुर, पोंदेवाडी, पिंपळगांव, अवसरी, पारगांव इत्यादी गावांनी टोमॅटोची तोडणी सुरु असली तरी संततधार पावसाने टोमॅटो बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढु लागला आहे. करपा आणि काळी टिक या रोगांमुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढु लागला आहे. आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी सुमारे ४०० एकर क्षेत्रात टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. शेतकरी नारायणगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री करत असतात. मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली नाहीत.तर ज्या शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली. त्या तरकारी पिकांना सध्या बऱ्यापैकी बाजारभाव मिळू लागला आहे. सध्या टोमॅटोच्या प्रति कॅरेटला ३५० ते ६०० रुपये बाजारभाव मिळत आहे.
Share your comments