
Pashabhai Patel farm
शेतकऱ्यांवर सध्या वाईट दिवस आले आहेत. यावेळी पाऊस, गारपीट यामुळे तो पूर्णपणे कोलमडला आहे. तसेच बाजारभावात होणारी घसरण यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना आता अनेक शेतकरी पारंपरिक पिके सोडून अनेक नवीन पिके घेत आहेत. यामुळे काही प्रमाणावर त्यांना पैसे मिळू लागले आहेत. असे असताना आता शेती विषयातील तज्ञ पाशाभाई पटेल यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांनी बांबूच्या शेतीविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच बांबूची शेती येणाऱ्या काळात कशी फायदेशीर ठरणार आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. यामधून चांगले पैसे मिळतील असेही ते यावेळी म्हणाले.
पाशाभाई पटेल म्हणाले की, येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे बंद केले जाणार आहे. यामुळे आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. यामुळे येणाऱ्या काळात याला मोठी मागणी असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोलापूरमधील राजशेखर शिवदारे यांनी त्यांच्या शेतावर केलेल्या बांबू लागवडीची पाशाभाई पटेल, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी करून चर्चा केली.
यावेळी पाशाभाई पटेल म्हणाले, आता केवळ पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने आणि बाजाराचा अभ्यास करुन शेती केल्यास फायद्याची ठरणार आहे. ऊस व अन्य फळपिकांपेक्षा बांबू शेती अतिशय फायद्याची आहे. बांबू शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. त्याचबरोबर बांबूला चांगला भाव आहे. सर्व उद्योगामध्ये बांबूचा वापर केला जातो इथेनॉल निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळून नफा प्राप्त करावा, असेही ते यावेळी म्हणाले. यामुळे आता शेतकऱ्यांनी याबाबत विचार करावा. सोलापूर जिल्ह्यात शेतीच्या पाण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
हे पीक घेण्यासाठी सरकारकडून मोठ्या योजना देखील आखल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. बांबूची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून त्यासाठी याोजनाही आखल्या आहेत. त्याची माहिती घ्या, बांबू लागवडीसाठी सबसिडीही दिली जात आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे बांबूची शेती फायदेशीर ठरणार आहे. याची शेती करत असताना जास्त प्रमाणावर औषधे देखील लागत नाहीत. तसेच झाडाला नैसर्गिक संकटाचा सामना देखील करताना जास्त इजा होत नाही.
Share your comments