गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विजेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसुली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहे. तसेच या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकर संघटनेने मंगळवार सकाळपासून तारापार्कमधील महावितरणाच्या मुख्य कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. राजू शेट्टी स्वत: या आंदोलनासाठी खुर्ची टाकून ठाण मांडून बसलेले आहे.
शेतातील कामे सोडून काय भजन, किर्तन, मनोरंजन करायला येथे आलेलो नाही. दिवसभर उन्हात बसलो तरी देखील अधिकाऱ्यांना दखल घ्यावी वाटली नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांचा रोष समजून घ्या. त्यांना किडे-मुंग्या समजू नका. त्यांचे प्रश्न गांभिर्याने घ्या, नाहीतर शेतकऱ्यांचा हिसका काय असतो. ते येथेच दाखवून देऊ, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. आता या प्रश्नाची तिथले अधिकारी कधी दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, राजू शेट्टी हे रात्रभर येथेच होते, येथेच झोपून त्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, दिवसा वीज मागणे हा आमचा अधिकार आहे. हे सांगताना शेट्टी यांनी महावितरणाच्या कारभाराचे वाभाडे काढले. जलविद्युत प्रकल्प चांगले असतानाही ते बंद असल्याचे भासवून वीजेची टंचाई आहे, म्हणून खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा घाट घातला होता. यावर आवाज उठवल्यानंतर चार तासात ते प्रकल्प सुरु झाल्याचे महावितरणाला जाहीर करावे लागले. ही आमच्या आंदोलनाची ताकद आहे. आताही दिवसा वीज देणे शक्य असतानाही महावितरण मुद्दाम रात्री वीज पुरवठा करत आहे.
रात्री अपरात्री पाणी पाजायला गेलेला पोर घरात येत नाही, तोपर्यंत आईबापाचा डोळा लागत नाही. वन्य प्राण्यांची भिती असतानाही जीव मुठीत घेऊन रात्री पाणी पाजायची वेळ येते. आमच्या पोरांच्या जीवाची काही किंमत या अधिकाऱ्यांना आहे की नाही? असाही सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सध्या राज्यातील सर्वच शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Share your comments