अहमदनगर- आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कृतीतून भूतदया जागविली आहे. गेल्या दहा वर्षापासून आपले घर, गावराण बियाणे बँक आणि बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणारा श्वान 'बाळू' तथा बाळासाहेबचा वाढदिवस केक कापून दिमाखात साजरा केला.
अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे हे राहीबाईंचे गाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावाच्या परिसरात अनेकवेळा बिबट्यांचा वावर दिसून होते. बाळू श्वानाने अनेकवेळा घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांचे बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण केले आहे. गेल्या सहा महिन्यांत पाच वेळा बाळूवल बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, निडर बाळूने स्वत:च्या जीवाची बाजी पणाला लावून हल्ला परतवून लावला.
जंगलामध्ये बिबट्यासोबतच्या झुंबडीत बाळू जखमी देखील झाला. बिबट्यांच्या तावडीतून सुटका करुन पुन्हा राहीबाईंच्या घरी परतला. यावेळी कुटुंबियातील सर्व सदस्यांना मोठ्या प्रमाणावर आनंद झाला. स्वत:च्या जीवाची बाजी पणाला लावून निडरपणे झुंजणाऱ्या बाळू श्वानाप्रती आपली कृतज्ञता वाढदिवस साजरा करून व्यक्त केली.
कोण आहेत राहीबाई पोपेरे?
राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव केला.
राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
Share your comments