मुंबई: राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नोव्हेंबर 2018 मध्ये राबविण्यात येणाऱ्या वैरण बियाणे वितरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन या योजनेतून 8 लाख 70 हजार मे.टन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
शासनाने राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. या 180 तालुक्यातील 1 कोटी 95 लाखाहून अधिक पशुधनाला चाराटंचाईला सामोरे जावे लागू शकते. या पशुधनाला प्रतिदिन 1 लाख 63 हजार मे. टन हिरवा चारा आणि 65 हजार मे. टन वाळलेल्या चाऱ्याची आवश्यकता आहे. पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये वैरण बियाणे वितरण योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
योजना नोव्हेंबर 2018 मध्ये राबविण्यात येणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकरी व पशुपालकांना वैरणीचे बियाणे व खते शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. कमीत कमी 10 गुंठे क्षेत्राकरिता 460 रुपये तर जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्रासाठी 4 हजार 600 रुपये अनुदान देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.
Share your comments