टोमॅटोचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात टोमॅटो पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे मुख्य पीक घेतले आहे, परंतु सद्यस्थितीत टोमॅटो वर आता जिवाणूजन्य करपा आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटो पिकावर आधीच मर रोग आला होता. आता करपा आला आहे. टोमॅटो पिकावर महागडी औषधे फवारून देखील मर रोग आटोक्यात येत नव्हता आणि त्यातच आता जिवाणूजन्य करपा टोमॅटो पिकावर असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर खेड शिरूर मुख्यत्वेकरून या चार तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रात टोमॅटोचे पीक घेतले जाते. खराब वातावरणामुळे सध्या टोमॅटोचे पीक कीड आणि रोगांचे विळख्यात सापडले चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावातील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटो पिकाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. यावर्षी कोरोनाच्या भयानक संकटामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक लागवडीला काहीअंशी प्राधान्य दिले नसले तरी ज्या शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटोची लागवड केली आहे. अशा शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक जगवण्यासाठी लाखो रुपये खर्च देखील केले आहेत. परंतु सद्यस्थितीत टोमॅटोची रोपे रोगांमुळे मोडून पुन्हा लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आणि त्यानंतर आता याच पिकावर जिवाणूजन्य करपा या रोगाने घातला. आधी प्रतिकूल वातावरणामुळे टोमॅटो आगारात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आता मोठ्या प्रमाणात जिवाणूजन्य करपा तोडणीस तयार असलेल्या टोमॅटोचे नुकसान करत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या लागवडीपैकी सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत जीवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या फळांवर करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील मेटाकुटीस आला असल्याचे दिसून येते. जिवाणूजन्य करपा हा रोग शक्यतो आटोक्यात येत नसल्याचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर गजेंद्र जगताप यांनी सांगितले. जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पानावर आणि फांद्यांवर झाल्यामुळे प्रकाश विश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. झाडांमध्ये अन्ननिर्मिती होत नाही परिणामी चांगल्या प्रकारचा टोमॅटो येत नाही. यामुळे बाजारात भाव देखील कमी येतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची केलेली लागवड आर्थिक दृष्ट्या तोट्याची ठरू पाहत आहे. आधी मर रोगामुळे टोमॅटोचे नुकसान होऊन टोमॅटोचा बागा मोडाव्या लागल्या तर आता जिवाणूजन्य करपा सतावत आहे.
यंदा टोमॅटो उत्पादनासाठी आतापर्यंत अनुकूल वातावरण राहिले नाही पुढे काय होईल हेही माहिती नाही, परंतु कोरोनाच्या महामारी बरोबरच आता शेतकरी बांधवांवर पिकांवर पडत असलेल्या रोगांचा परिणाम जाणवत असून यावर्षी शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत टोमॅटो उत्पादक शेतकरी अनिल नेहरकर यांनी सांगितले.
Share your comments