
मुंबई, दि. 21 : देशी गायींचे संवर्धन व्हावे आणि सेंद्रीय शेतीला चालना मिळावी यासाठी जालना येथे राष्ट्रीय स्तरावरील पशू पक्षी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पशू संवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरणार आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर होणारे हे प्रदर्शन भव्य आणि आकर्षक असे ठरणार आहे. पशू , दुग्ध आणि मत्स्य तसेच कृषी अशा व्यापक विषयावर आधारित हे प्रदर्शन असणार आहे. सुमारे 100 एकर जागेवर भरणाऱ्या या प्रदर्शनात देशातील उत्कृष्ट प्रतीच्या पशूंना एकत्र बघता येणार आहे. यात ‘मागेल त्याला पशुधन’, ‘चारा घास योजना’, ‘तलाव तेथे मासळी’ यासारख्या प्रस्तावित योजनांची माहिती देण्यात येणार आहे. उत्तम जातीचे बैल, गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या, घोडे, गाढवे या प्रदर्शनात बघायला मिळतील तर वराह पालन, कुक्कुटपालन, रेशीमकोष पालन याबाबत तसेच इतर विषयांवर चर्चासत्रातून माहिती देण्यात येणार आहे.
देशी जातीच्या राज्यातील तसेच देशभरातील गायी, म्हशी, शेळ्या बकऱ्या,कोंबड्यांच्या उत्कृष्ट जाती या ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. याप्रदर्शनाला देशभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी मंत्री श्री. जानकर व राज्यमंत्री श्री. खोतकर प्रत्यक्ष जाणार आहेत. या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. खोतकर यांनी केले आहे.
प्रदर्शनाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पदुम विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, दुग्ध विकास आयुक्त राजीव जाधव, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.