परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक 18 मे शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन माजी कृषी आयुक्त तथा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक श्री. उमाकांत दांगट हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञ खरीप पिक लागवड व व्यवस्थापन तसेच शेती पुरक जोडधंदे याविषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्न व शंकाचे शास्त्रज्ञ निरासरनही करणार आहेत.
याप्रसंगी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी दालनाचा समावेश राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही होणार आहे. सदरिल मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार पाटील यांनी केले आहे.
Share your comments