अमरावतीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन

Monday, 14 January 2019 08:02 AM


अमरावती:
 कृषी विभागातर्फे नियोजित जिल्हा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरला पाहिजे. त्याच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, धारणी प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय इंगळे, अनिल खर्चान, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, महोत्सवासाठी प्रत्येक गावातून शेतकरी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावा. गावपातळीवर कृषी सहायकांनी गावोगावच्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सहभाग मिळवावा. शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा असाव्यात. धान्य महोत्सवात डाळ, तेल, गूळ यासह मेळघाटातील तांदूळ आदी उत्पादने, तसेच लेंडी पिंपळी, सफेद मुसळी आदी औषधी वनस्पतींचा समावेश असावा. त्यांचे उपयोग, गुणधर्म याबाबत माहिती ठळकपणे मांडावी. प्रदर्शनात आलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला माहिती देण्यासाठी सहायक तिथे पूर्णवेळ उपस्थित असावेत. शेती उत्पादने, यंत्र आदींची माहिती देणारे फलक सुस्पष्ट व नेमके असावेत. चर्चासत्र, परिसंवादासाठी नामवंत कृषीतज्ज्ञांचा सहभाग मिळवावा.

बांधावर विविध उपयुक्त झाडे लावल्यास त्यापासून होणारा फायदा, त्यासाठीच्या योजना आदींची सविस्तर माहिती मिळावी. स्थानिक महत्वाच्या शेती उत्पादनांचा समावेश असावा. प्रदर्शनात अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वदूर प्रसिद्धी करावी. त्याचप्रमाणे, शासनाच्या विविध विभागांसह कृषी संजीवनी योजना, बीज प्रमाणीकरण, टंचाई उपाययोजना, रेशीम विकास, मृदसंवर्धन, जलसंधारण, परसबाग योजना आदींची माहिती देणारे कक्ष असावेत. आवश्यक तिथे सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घ्यावा. जिल्ह्याबाहेरील प्रयोगशील शेतकऱ्यांनाही निमंत्रित करावे. प्रदर्शनाला येणाऱ्या शेतकरी बांधवाला नवे तंत्रज्ञान, मार्केटिंग, यंत्रणा यांची पूरेपूर माहिती मिळाली पाहिजे. यशोगाथांतून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. यादृष्टीने प्रदर्शनाचे उत्तम आयोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Amravati melghat pravin pote प्रवीण पोटे मेळघाट अमरावती

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.