Kharif Season 2023 News :
कृषी विभागाने खरीप हंगाम २०२३ पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील पुणे कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागामार्फत या चालू खरीप हंगामात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे, अशी माहिती मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिली आहे.
राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवण्यात येत असल्याची माहिती पुणे कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने काही अटी शर्ती लावल्या आहेत. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर शेतकरी माहिती पाहू शकतात.
Share your comments