Pm Narendra Modi : सेंद्रिय शेती करून आपले उत्पन्न सात पटीने वाढवल्याबद्दल पंतप्रधानांनी मिझो शेतकऱ्याचे कौतुक केले आहे. सेंद्रिय शेती सामान्य लोक आणि जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे, असं देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी (दि.८) रोजी विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी तसेच विकास भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मिझोराम येथील आइजोल शुयाया राल्ते हे २०१७ पासून सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारे शेतकरी आहेत. ते शेतीत आले, मिझो मिरची आणि इतर भाज्यांचे उत्पादन घेतात. त्या उत्पादनांबद्दल त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितले की, ते नवी दिल्लीपर्यंत विविध कंपन्यांना आपले उत्पादन विकू शकतात. यामुळे त्याच्या उत्पन्नात २० हजार रुपयांवरून १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्याबाबत विचारले असता राल्ते म्हणाले की, ईशान्येकडील भागात मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट अंतर्गत एक बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. जिथे शेतकरी कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचा माल विकू शकतात. देशातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याकडे वाटचाल करत आहेत आणि ईशान्येकडील दुर्गम भागातील राल्ते सारखे शेतकरी त्यासाठी मार्ग मोकळा करत आहेत. याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सेंद्रिय शेती ही सर्वसामान्य माणसांसाठी आणि जमीनच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. गेल्या नऊ वर्षांत रसायनमुक्त उत्पादनांची बाजारपेठ सात पटीहून अधिक वाढली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढलेच पण ग्राहकांचे आरोग्यही सुधारले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले आणि इतरांनीही सेंद्रिय शेती करण्याची पद्धत अवलंबावी असे आवाहन देखील मोदींनी केले.
Share your comments