1. बातम्या

ॲग्री बिझनेस योजनेचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

KJ Staff
KJ Staff


नागपूर
: शेतकऱ्यांना उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण व्यवस्था निर्माण करणारी अॅग्री बिझनेस ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील 10 हजार गावांमध्ये राबविण्यात येणार असून यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी गटांनी ॲग्री बिझनेसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, माजी खासदार विजय दर्डा, सागर कौशिक, तसेच ब्राझील, दक्षिण कोरिया, भूतान, श्रीलंका आदी 11 देशांतील तज्ञ प्रतिनिधी व राज्याच्या विविध भागातून आलेले कृषितज्ञ तसेच विविध संस्थांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जगामध्ये नागपूर व विदर्भाच्या संत्र्याला विशेष ओळख असूनही संत्र्याच्या प्रजाती विकसित करताना शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासोबतच बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदर्भात ऑरेंज इस्टेट सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत चांगल्या प्रकारच्या कलमांच्या उत्पादनासोबतच पॅकिंग, ग्रेडिंग आदि बाबींची माहिती संत्रा उत्पादकांना या माध्यमातून होत असून, संत्रानिर्यातीला सुरुवात झाली आहे.

संत्रा उत्पादकांना संत्र्याच्या उत्पादनासोबतच चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी संत्र्यापासून विविध पदार्थ तयार करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असून, सर्व फळांना जागतिक बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध उत्पादनांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत फळांचा पल्प वापरण्याची सूचना केली असून, कोका कोलासारख्या उत्पादनात त्याचा वापर होत असल्यामुळे निश्चितच चांगली बाजारपेठ मिळणार आहे. नागपुरातील नोगा ब्रँडला संपूर्ण मदत देऊन मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

रिमोट सेन्सिंग व ड्रोनचा वापर करुन कृषी उत्पादनाच्या साखळीचे डिजिटलायजेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत असून, या माध्यमातून पेरणीपासून ते उत्पादनाच्या अवस्थेपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उपाययोजना एसएमएसद्वारे पुरविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे किडीच्या नियंत्रणापासून उत्पादन घेण्यापासूनची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यातील 2 हजार मंडळांमध्ये ॲटोमॅटिक वेदर स्टेशन बसविण्यात आले असून, याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गडकरी म्हणाले, विदर्भाच्या विकासामध्ये संत्रा उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. संत्रा हे फळ संपूर्ण जगात टेबल फ्रूट म्हणून ओळखले जात असले तरी यापासून ज्यूस करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. संशोधकांनी संशोधन करणाऱ्या संस्थांनी बायो टेक्नॉलॉजीचा वापर करुन संत्र्याची गोडी कशी वाढवता येईल. तसेच संत्रा हा ज्यूस म्हणून वापर होईल, यासाठी संशोधन करावे व जागतिक दर्जाच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

द्राक्षाप्रमाणे संत्रा उत्पादक संघ तयार करुन संत्र्याच्या संशोधनावर अधिक भर द्यावा व संत्र्यापासून विविध पदार्थ तयार करतानाच ग्रेडेशनला विशेष महत्त्व द्यावे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागतिक संत्रा महोत्सवामध्ये विविध दालनांना भेट देऊन संत्र्याच्या विविध प्रजातींची माहिती घेतली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी संत्र्यापासून तयार केलेल्या 500 किलो हलव्याचे उपक्रमाला भेट देऊन संत्र्यापासून चांगल्या प्रकारचा हलवा तयार होऊ शकतो, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विष्णू मनोहर यांचे विशेष अभिनंदन केले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त  केले. प्रारंभी माजी खासदार विजय दर्डा यांनी संत्र्याची पेटी देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व जागतिक संत्रा महोत्सव आयोजनाबद्दल माहिती दिली. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, केंद्रीय संशोधन केंद्रांचे प्रमुख, देशाच्या विविध भागातून आलेले कृषी संशोधक व शेतकरी उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters