औरंगाबाद: कोरोना विषाणु रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दुष्टीने राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांना शेतकरी बांधवाना शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे शक्य होत नाही, यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील व विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी झुम क्लाउड एपच्या माध्यमातुन दिनांक 12 एप्रिल रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
डॉ. एम. बी. पाटील यांनी मोसंबी, डाळिंब व ऊस पिकावर मार्गदर्शन केले. सध्या मोसंबी व आबा फळपिकात फळगळ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठी मोसंबी पिकातील फळगळ कमी करण्यासाठी दोन फवारणीच्या शिफारस डॉ. एम. बी. पाटील यांनी केली, यात एनएए 2 ग्रॅम व 1 किलो युरिया शंभर लिटर पाण्यात मिसळुण एक फवारणी घेऊन पंधरा दिवसांनी 13:00:45 दिड किलो व जिब्रलिक एसिड 2 ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळुण फवारणी करण्याचा सल्ला दिला. तसेच आंबा पिकातील फळगळ कमी करण्यासाठी 13:00:45 दिड किलो व जिब्रॅलिक एसिड 2 ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळुण फवारणी करण्याचा सल्ला दिला.
यावेळी डॉ. एस. बी. पवार यांनी कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर शेतकरी बांधवानी कोणती काळजी घ्यावी याविषयी भारतीय कृषि संशोधन परिषदेने दिलेल्या सुचनेनुसार शेतीत करावायाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले तसेच उन्हाळी हंगामात ऊस पिकाचे आंतरमशागत, किड व रोग व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली.
ऑनलाईन चर्चेमध्ये औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे, जालना कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. सोनुने यांनीही सहभाग घेतला. तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयातील 25 ते 30 शेतकरी बांधवानी सहभाग घेतला व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली.
Share your comments