राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील कांदा पिकाची काढणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात देखील खरीप हंगामातील लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी कांदा उत्पादक शेतकरी आणताना दिसत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळत आहे, मात्र असे असले तरी जिल्ह्यातील बाजारपेठेत सरासरी बाजार भाव हा अद्यापही वधारलेला नाही, याउलट सरासरी दरात थोडीशी घट नमूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी 19 रुपये किलो ते 21 रुपये किलो कांद्याला बाजार भाव प्राप्त होताना दिसत आहे. तसेच या हंगामातील खरीप कांद्याचे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन कमी प्राप्त होणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावे लागणार आहे.
बदलत्या वातावरणाचा कांदा या नगदी पिकाला फटका
खरीप हंगामापासून निसर्गाचा लहरीपणा हा कायमच आहे. कधी अतिवृष्टी कधी अवकाळी तर कधी ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे, जिल्ह्यात हंगामाच्या सुरवातीपासूनच रोगीष्ट वातावरण कायम बनले आहे त्यामुळे कांद्याचा दर्जा हा कमालीचा खालावलेला असून यामुळे उत्पादनात देखील न भरून निघणारी घट झाली आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, खरीप हंगामापासून सुरू असलेल्या या वातावरण बदलाचा फटका कांदा पिकाला बसला असल्याने कांद्याच्या पिकातून कांदा लागवडीसाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील झाले आहे. असं जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे बोगस मिळाल्याने कांद्याचा दर्जा खालावला तसेच यामुळे उत्पादनात घट देखील बघायला मिळत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा पिक सडले आहे.
जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, आगामी एक महिन्याच्या काळात लेट खरीपचा रांगडा कांदा बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे, तसेच रांगडा कांदा देखील मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसात सापडला असल्याने रांगड्या कांद्यावर रोगराईचे सावट कायम आहे. यामुळे रांगडा कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर रांगडा कांद्याच्या उत्पादनात घट झाली तर बाजारपेठेत कांद्याचे दर वधारले अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या बाजारभावात थोडीशी बढती नमूद करण्यात आली आहे, तसेच कांद्याचे दर हे गेल्या महिन्याभरापासून टिकून असल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र यावेळी नजरेस पडत आहे.
Share your comments