
onion
महाराष्ट्रात समवेतच मध्यप्रदेश राज्यात सर्वात जास्त कांदा उत्पादित केला जातो. प्रमुख कांदा उत्पादक राज्यात मध्यप्रदेश राज्याचे एक वेगळे स्थान आहे. नासिक सारखेच मध्यप्रदेश राज्यातील नीमच देखील कांदा उत्पादनासाठी ओळखले जाते. मध्यप्रदेश राज्यातील सर्वात जास्त कांदा नीमच मध्य उत्पादित केला जात असल्याचे सांगितले जाते. नीमच येथे मध्यप्रदेश मधील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अस्तित्वात आहे. मात्र सध्या मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेत कांद्याला कवडीमोल दर प्राप्त होत असल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
एमपी मध्ये परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री करण्याऐवजी फेकून दिला आहे. नीमच मधील बाजारपेठेतील चित्र बघता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पदरी निराशा पडत असल्याचे बघायला मिळत आहे. नीमच जिल्ह्यातील माळवा येथे मोठ्या प्रमाणात कांदा व लसुनची लागवड केली जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा व लसुन पिकावर अवलंबून असते. या भागात उत्पादित केला जाणारा लसून परदेशात देखील निर्यात केला जातो. सध्या नीमच बाजारपेठेत मध्यम दर्जाचा कांदा मात्र चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढ्या मामुली दराने विक्री होत आहे. तर चांगल्या प्रतीचा कांदा 1200 रुपये प्रतिक्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत आहे. बाजारपेठेत मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडाच पण कांदा विक्री करण्यासाठी लागणारा खर्च देखील निघत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनभरारी घेत आहेत त्यामुळे शेतमाल वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे, म्हणून सध्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दर कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा खर्च देखील काढू शकत नाही. सध्या संपूर्ण देशात पावसाळी हंगामातील कांदा विक्रीसाठी आणला जात आहे, पावसाळी कांदा जास्त काळ साठवून ठेवता येत नसल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आपला सोन्यासारखा कांदा फेकून देण्याची नामुष्की ओढावली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत सुमारे 40 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. त्यामुळे उत्पादन खर्च काढून हाती चार पैसे शिल्लक पडण्यासाठी कांदा सुमारे चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री झाला पाहिजे.
कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे बाजारसमिती प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनाने कांद्याचा दर्जा खराब असल्याचे कारण पुढे केले आहे. तसेच प्रशासनाने सांगितले की चांगल्या दर्जाचा कांद्याला समाधानकारक बाजार भाव सध्या मिळत आहे. एकंदरीत नीमच मधील परिस्थिती बघता शेतकऱ्यांना आसमानी संकटात समवेतच सुलतानी संकटांचा देखील सामना करावा लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Share your comments