कांदा हे एक नगदी पीक आहे आणि याची महाराष्ट्रात सर्वात जास्त लागवड बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. मात्र, नगदी पीक असलेला कांदा किती बेभरवशाचा ठरू शकतो याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातून समोर येत आहे. कांद्याचे दर बनण्यासाठी आणि बिघडण्यासाठी केवळ काही तासांचा कालावधी लागतो. त्यामुळेच की काय शेतकरी बांधव कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये असे नेहमी बोलत असतात.
कांद्याचे दर गेल्या महिन्याभरापासून चांगले टिकून होते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बेभरवशाचा कांदा यंदा भरवशाचा ठरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाल कांद्यातून तर पैसा केलाच शिवाय उन्हाळी कांद्यातून देखील चांगला पैसा कमविला. पण या हप्त्याच्या सुरुवातीपासून असं काय बिनसलं की कांद्याचे दर धडाम जमिनीवर आले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडायला सुरुवात झाली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधींच भुर्दंड- हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसात लाल कांद्याच्या दरात तब्बल सातशे पन्नास रुपयाची घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याच्या दरात ही साडेसहाशे रुपये प्रति क्विंटल एवढी घट घडून आली आहे. बाजारपेठेत कांद्याची मागणी कमी आणि कांद्याची आवक अधिक झाल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
याव्यतिरिक्त, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धापोटी कांदा निर्यात करण्यास अडचणी येत असल्याने कांद्याच्या दरात एवढी घट झाल्याचे तज्ञ सांगत आहेत. असे सांगितले जात आहे की, कांद्याच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल पावणे बारा कोटी रुपयांचा भुर्दंड लागला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 17 बाजार समित्यांच्या लीलावानुसार बघितलं तर जवळपास 80 ते 100 कोटी रुपयांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असेल असा अंदाज सांगितला गेला आहे.
दरात घसरण का बरं?- यावर्षी कांद्याला बराच वेळ समाधानकारक बाजार भाव मिळत होता, कांद्याचे दर बरेच दिवस टिकून राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील कांदा काढणीला विशेष गती देत कांदा काढणी होताच बाजारपेठांचा उंबरठा गाठला यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे शिल्लक राहिले. परंतु आता बाजारपेठेत उन्हाळी कांद्याचे आगमन बघायला मिळत आहे, आणि ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा थोडा काळ साठवून भाववाढीची आशा बघितली होती त्यांनी देखील आता कांदा विक्रीसाठी काढला आहे. यामुळे बाजारपेठेत कांद्याची अचानक आवक वाढली आहे. बाजारपेठेतील गणितानुसार आवक वाढली की बाजार भाव खाली येण्यास सुरुवात होते त्यामुळे या सप्ताहात कांद्याच्या भावात मोठी घट झाली आहे. याशिवाय युद्धामुळे तसेच सरकारी धोरणामुळे कांद्याची निर्यात अपेक्षित होत नसल्याने कांद्याचे दर पडले असावे असा अनेकांचा अंदाज आहे.
Share your comments