देशात सर्वात जास्त महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कांदा उत्पादित केला जातो. सध्या राज्यातील सर्व प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक नमूद केली जात असून, सध्या बाजारपेठेत दाखल होणारा कांदा खरीप हंगामातील लाल कांदा आहे. राज्यात सर्वात जास्त आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Agricultural Produce Market Committee) होत असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर बाजार पेठेत रोजाना 1200 ट्रक एवढी दमदार आवक नमूद केली जात आहे.
खरीप हंगामातील लाल कांद्याची विक्रमी आवक होत असल्याने याचा परिणाम कांद्याच्या दरावर होत असून सध्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात कमालीची घसरण नोंदवली गेली आहे. एकीकडे बाजारपेठेत रोजाना उच्चांकी आवक होत आहे तर दुसरीकडे सरकारच्या (Government) उदासीन धोरणामुळे कांदा निर्यात संपूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मायबाप सरकारला कांदा निर्यातीला चालना देण्याची मागणी केली असून कांद्याला परदेशी चांगला दर मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. सध्या दिवसेंदिवस राज्यातील सर्वच बाजारपेठेत लाल कांद्याची उच्चांकी आवक होत आहे मात्र असे असले तरी केंद्रशासनाने कांदा निर्यातीसाठी अद्यापही कुठलेच ठोस धोरण कार्यान्वित केले नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच आगामी काही दिवस परिस्थिती अशीच राहणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे कुठलेच चित्र बघायला मिळत नाही. एकीकडे लाल कांद्याची दमदार आवक तर दुसरीकडे उन्हाळी कांद्याची (Of summer onions) विक्रमी लागवड यामुळे कांद्याला भविष्यातही चांगला दर मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.
उन्हाळी कांद्याची लागवड पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते, या चालू रब्बी हंगामात देखील उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात या विभागात लावला गेला आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती याचा विपरीत परिणाम कांदा पिकावर झाला, खरिपातील लाल कांदा यामुळे प्रभावित झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लेट खरीप हंगामातील नवीन लाल कांदा लागवडीकडे मोर्चा वळवला होता. या नवीन लाल कांद्याची लागवड देखील विक्रमी झाली तसेच त्याची प्रतवारी ही खूपच चांगली असल्याचे सांगितले जात आहे. नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे त्यामुळे कांद्याची निर्यात झाली नाही तर याचा परिणाम दरावर होईल अशी आशंका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा अधिक कांद्याची आवक होत असून तूर्तास तरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची कुठलेच चिन्हे बाजारपेठेत दिसत नसल्याचे सांगितले जात आहे.
बाजारपेठेत सध्या चांगल्या कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल ते 2300 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत आहे. तर मध्यम प्रतीच्या कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सध्या मिळत असलेले दर गतवर्षीच्या तुलनेने खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीबाबत ठोस धोरण अंगिकारणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशात असलेल्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Share your comments