पुणे: राज्यात अनलॉक करण्यात आले यामुळे बाजारपेठे सुरु होत असून आर्थिक चक्र फिरू लागेल. यामुळे सर्व स्तरातील घटक सुटकेचा श्वास सोडत आहेत. पण कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत. तर, मुंबईतील बहुतांश उपाहारगृहे बंद असल्यामुळे कांद्याची मागणी निम्म्याने घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याला सहा ते साडेआठ रुपये दर मिळत असून कांद्याचा वाहतूक खर्च करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजार आवारांचे काम सुरू झाले. त्यानंतर पुन्हा टाळेबंदी लागू झाली. जुलै महिन्यात पुण्यातील मार्केटयार्ड दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत कांद्याची आवक कमी होत चालली आहे. शेतकरीही बाजारात कांदा विक्रीस पाठवित नाहीत. कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी थेट बांधावरूनच कांदा- विक्री करत आहेत.
येत्या सोमवारपासून नगर येथील बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. बाजार आवाराचे कामकाज सुरळीत होत नसल्याने आवक कमी होत चालली आहे. सध्या मार्केटयार्डात दररोज फक्त २५ ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात आहे. नेहमीच्या तुलनेत ही आवक कमी आहे. पुणे, मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अनेक शेतकरी बांधावरच कांदाविक्रीस प्राधान्य देत आहे. मोठे व्यापारी बांधावरूनच कांदा खरेदी करत आहेत. सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला प्रतवारीनुसार ६० ते ८५ रुपये असे दर मिळत आहेत.
Share your comments