गेल्या एका महिन्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक नमूद करण्यात येत आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची एवढी प्रचंड आवक झाली की ही बाजारपेठ देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचातएक अजून मानाचा तुरा रोवला गेल्याचे सांगितले जात आहे. बाजारपेठेत कांद्याची बंपर आवक होण्याचा सिलसिला अद्यापही जारी आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बुधवारी बाजारपेठेत 88,000 क्विंटल एवढी विक्रमी कांद्याची आवक झाली.
कृषी तज्ञांच्या मते, सध्या राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी प्रगतीपथावर आहे. लाल कांदा खांडणी झाल्यानंतर साठवणक्षमता अल्प कालावधीची असल्याने लागलीच विक्रीसाठी न्यावा लागतो. लाल कांद्याची लवकर विक्री केली गेली नाही तर या कांद्याला कोंब येऊ लागतात तसेच सडण्याची देखील भीती असते त्यामुळे काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव लगेच लाल कांदा विक्रीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे कांद्याची बंपर आवक होत असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर बाजार पेठेत देखील खरीप हंगामातील लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
आवक एवढी जास्त होत आहे की, गेल्या महिन्याभरात सोलापूर बाजार पेठ दोनदा बाजार समिती प्रशासनाला बंद करावी लागली आहे. मात्र, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत होते. म्हणुन कांदा उत्पादक संघटनेने याविरुद्ध आवाज उठविला त्या अनुषंगाने कांदा उत्पादक संघटनेने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला एका पत्राद्वारे सूचित केले. कांदा उत्पादक संघटनेने बाजार समितीला कांद्याची प्रचंड आवक होत असल्याने बाजारपेठेच्या आवारात वाढीव जागांची तरतूद करण्याची मागणी केली त्यामुळे कांदा लिलाव बंद होणार नाही आणि परिणामी शेतकर्यांची हेळसांड देखील होणार नाही असे संघटनेचे म्हणणे होते.
तसेच कांदा उत्पादक संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर प्रशासनास रोखठोक बजावले होते की, जर प्रशासनाने संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संघटना तीव्र आंदोलन बाजारपेठेच्या आवारात करणार. कांदा उत्पादक संघटनेच्या या आक्रमक धोरणामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आता बाजारपेठेत कितीही आवक झाली तरी यापुढे बाजारपेठ बंद ठेवली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments