राज्यात सर्वत्र कांद्याची लागवड केली जाते कांदा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यासमवेतच पश्चिम महाराष्ट्रात खरीप मध्ये पिकवल्या जाणाऱ्या कांद्याला लाल कांदा म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील खरीप हंगामातील लाल कांद्याची सध्या स्थितीला काढणी सुरू आहे. मात्र काढणी सुरू असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुढे आता एक नवे आव्हान उभे झाले आहे, काढणी केलेल्या कांद्याला बाजारात विक्रीसाठी नेण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कोंब येत असल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी कांदा खरेदी केल्यानंतर व्यापारी पुढे विक्रीसाठी पाठवत असताना कांद्याला कोंब येत असण्याची समस्या व्यापाऱ्यांपुढेही उभी राहिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व कांदा खरेदी करणारे व्यापारी पुरते संकटात सापडले आहेत.
नाशिक जिल्हा कांद्याचे आगार म्हणून जगात विख्यात आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यातील बहुतांश शेतकरी केवळ आणि केवळ कांदा पिकावर अवलंबून असतात परिसरातील अनेक शेतकरी कांदा या नगदी पिकाची लागवड करत असतात आणि त्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावरच अवलंबून असते. आता परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी लाल कांद्याची काढणी करत आहेत, मात्र काढणी केलेल्या लाल कांद्याला विक्रीला पाठवण्यापूर्वीच कोंब येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून सतत वातावरणात प्रतिकूल बदल बघायला मिळत आहेत, कधी अवकाळी, कधी ढगाळ वातावरण, कधी धुके, तर कधी दड अर्थात दंव या सर्व गोष्टींमुळे काढणी केलेल्या कांद्याला कोंब येत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कांद्याचा दर्जा खालावत असल्याचे सांगितले जात आहे.
आणि म्हणूनच कोंब फुटलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होत नाही. तसेच अनेक कांदा उत्पादक शेतकरी कोंब फूटलेला कांदा उकिरड्यावर फेकून देत आहेत. या एकत्रित बनलेल्या समीकरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या हाल-अपेष्टा सहन करून खरीप हंगामात कांदा लागवड केली आहे. खरीप हंगामात लागवड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोपवाटिका अतिवृष्टीमुळे खराब झाल्या होत्या, त्यामुळे कांदा लागवड प्रभावित झाली होती. यातून कसेबसे समाधान शोधत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांद्याची लागवड केली, लागवड केल्यानंतर देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट देखील नमूद करण्यात आली होती.
या सर्व्या संकटांना मात देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील लाल कांदा पिकवला आणि आता सद्यस्थितीला काढणीला सुरुवात केली आहे, मात्र काढणी केल्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढचे आवाहने काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता या काढणी केलेल्या कांद्याला कोंबे फुटत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे आणि यामुळे परिसरातील नव्हे-नव्हे तर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
Share your comments