Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan News
नागपूर : आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड देतात. आपल्या शेतातील उत्पादनासाठी घाम गाळतात. त्यांच्या घामाला, कष्टाला न्याय देण्यासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम म्हणून कृषी विभाग आता काम करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानअंतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड . माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड . आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरु नितीन पाटील, कृषी आयुक्त सुरज मांडरे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ.एम.एल.जाट, डॉ.एस.के.सिंग, डॉ.अमरेश कुमार नायर, डॉ.डी.के. यादव, डॉ. राजवीर सिंह व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेती व शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेअंतर्गत देशात १६ हजार वैज्ञानिक आहेत. त्यांचे विविध पिकांवर सतत संशोधन सुरु असते. याचबरोबर परिषदेअंतर्गत ११३ संशोधन केंद्र आहेत. यातील ११ केंद्र महाराष्ट्रात आहेत. याचा जोडीला जिल्हा कृषी केंद्र, प्रगतशील शेतकरी, राज्य सरकारचे कृषी कार्यालये आहेत. या सर्व यंत्रणेमध्ये एकसुत्रतेचा अभाव लक्षात घेऊन एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम या संकल्पनेची नितांत गरज होती असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
कृषी हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गौरवशाली भारत, समृद्ध भारत पाठोपाठ शक्तीशाली भारत निर्माण केला आहे. भारत आता वैभवशाली राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. याला अधिक भक्कम जर करायचे असेल तर विकसित शेती व विकसित शेतकरी हे तत्व आपण जपले पाहिजे. विकसित खेती व समृद्ध किसान पाठोपाठ विकसित व गरिबीमुक्त गाव हे शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
Share your comments