यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या कष्टावर पूर्ण पाणी फेरतांना दिसत आहे. या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले, या अवकाळी मुळेरब्बी हंगामाचा पेरा देखील लांबला होता. शेतकऱ्यांनी कसाबसा रब्बीचा पेरा आपटला मात्र आता अजून अवकाळी पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली, यावेळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेच मात्र यात जीवितहानी देखील झाल्याचे समोर आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात ही घटना घडली आहे, याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील धुसडा नवेगाव गावातील नयन नावाचा नऊ वर्षाचा मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत म्हैस राखण्यासाठी शिवारात गेला होता, तेव्हाच विजेचा कडकडाट सुरु झाला आणि वीज पडून नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेतामध्ये बांधलेला बैल देखील वीज कोसळल्याने मरण पावल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र अवकाळी पावसाने व गारपिटीने हाहाकार माजवला, यात काढण्यासाठी आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय रब्बी हंगामात झालेल्या लागवडीचे देखील यामुळे नुकसान होणार अशी आशंका व्यक्त केले जात आहे शिवाय या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे जीवितहानी देखील झाली आहे.
नयनचे आजोबा दररोज म्हैस चारण्यासाठी गावातील पडीत शिवारात जात असत, नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील आजोबा म्हैस चारण्यासाठी गेले पण मंगळवारी त्यांचा नातू देखील सोबतीला आला. म्हैस चारताना नयन च्या अंगावर वीज कोसळली आणि यात तो मृत्युमुखी पडला. वीज कोसळल्याने त्यांचा एक बैल देखील मरण पावला. या आकस्मिक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर आपटला आहे. परिसरात या घटनेविषयी मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हृदयविदारक घटनेमुळे नयनच्या परिवाराचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेला हा अवकाळी पाऊस या पुंडे कुटुंबाला मोठे दुःख देऊन गेला आहे.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर या तालुक्यात या अवकाळीने रब्बी हंगामातील पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आधीच खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आता या अवकाळीने रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल असे सांगितले जात आहे.
Share your comments