शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी आंदोलन करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना इंदापूरात पिके जाळून चालली असताना राज्यमंत्री भरणे शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत काहीच बोलत नसल्याचे आरोप भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सध्या सुरू आहे. यामुळे आता ही कारवाई थांबणार का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणी निर्माण होत असल्याने आंदोलन तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भारनियमनाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्याला भारनियमनाचा फटका येत्या काही दिवसांत बसण्याची शक्यता आहे. अकोला तालुक्यातील वीज उपकेंद्राच्या कार्यक्रमानंतर ऊर्जामंत्र्यानी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे संकेत दिले आहेत.
सध्या काही दिवस पुरेल एवढाच राज्यात कोळसा शिल्लक असल्याचे सांगत कोळशाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. त्या अनुषंगाने विज बिले वेळेवर भरण्याचे आवाहन त्यांनी वीज ग्राहकांना केले आहे. कोरोना काळात आणि राज्यात आलेल्या विविध संकटांमध्ये विजेचा पुरवठा केला गेल्याने शिवाय कोळसा टंचाईमुळे वीजप्रश्न गंभीर होऊन बसला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांची मागणी आणि दुसरीकडे राज्यात वीज टंचाईचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत यामुळे भविष्यात राज्यातील वीजप्रश्न चिघळण्याची शक्यता टाळता येत नाही.
यावर आता महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती कशी हाताळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे येणाऱ्या काळात विजेची जास्त गरज असताना मात्र हे नवीनच संकट राज्यात उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात यावरून वातावरण पेटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत.
Share your comments