एक मार्चपासून गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 30 रुपये खरेदी दर करण्यावर दूध उत्पादक प्रक्रिया व्यवसाय कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
इतकेच नाही तर गाईच्या दूध खरेदी मध्ये दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाचे नेतृत्व करणारी दूध उत्पादन प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी रात्री पुणे येथे पार पडली. या वेळी हा निर्णय एकमताने घेण्यात आला.बैठक संपल्यानंतर याबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्के यांनी सांगितले की, ज्या सहकारी आणि खासगी दूध संघाकडून गाईच्या दुधाची खरेदी 27 रुपये लिटरने होत होती ते आता तीन रुपये प्रति लिटर गाईच्या दुधात वाढ करतील आणि जे संघ 28 आणि 29 रुपयाने दूध खरेदी करीत होते ते अनुक्रमे दोन रुपये आणि एक रुपये वाढणार आहेत. त्यामुळे साडेतीन फॅट व साडेआठ एसएनएफ गुण प्रतीच्या गाईच्या दुधाची खरेदी एक मार्चपासून सरसकट तीस रुपये दराने खरेदी होणार आहे.
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम जागतिक बाजारात दूध पावडर आणि बटर च्या भाववाढीवर झाला आहे.जर जागतिक पातळीवरील बाजारामध्ये दूध पावडर निर्यातीचा विचार केला तर त्यामध्ये युक्रेन या देशाचा वाटा आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात बंद झाल्याने भारतीय दूध पावडर ला जागतिक बाजारातून मागणी वाढल्यामुळे दूध पावडर चे किलोचे भाव आहे 260 ते 270 रुपयांवरून थेट 280 ते 300 रुपये झाले आहेत.
त्यासोबतच बटर चे भाव देखील 340 350 रुपयांवरून 380 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत. सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा दुधाचे दर वाढविण्यात आल्याचे ही म्हस्के यांनी सांगितले.(स्त्रोत-पुढारी)
Share your comments