काल देशाचे लक्ष लागलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. असे असताना यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्यांनी यावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागील अनुभव बघता त्यातील आश्वासनांवर विश्वास ठेवण्यासासारखी परिस्थिती नाही अशी टीका त्यांनी केली आहे, यामुळे आता भाजपकडून काय उत्तर दिले जाणार हे लवकरच समजेल.
ते म्हणाले, सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती की हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल. पण कर-रचना जैसे थे आहे. नोकरी आणि व्यवसायासंदर्भात अपेक्षा जास्त होत्या, पण बजेट पहिल्या नंतर निराशा आली आहे. भारत हा शेती क्षेत्रात लक्ष देणारा देश आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट केले आहे. यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी विचार करणे गरजेचे होते, मात्र तसे काही झाले नाही. शेतकऱ्यांना यामधून काही मिळाले नाही.
साहजिकच शेतकऱ्यांच्या अपेक्षा असणार की शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक व्हावी, पण त्याची पूर्तता झाली नाही. शेती प्रश्नांवर लक्ष घालणारे जे घटक आहेत त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेतली तर त्यांची निराशा झाली असल्याचीही त्यांनी टीका केली. कोरोनातुन बरे झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाइन विक्रीबाबत देखील मोठे वक्तव्य केले. राज्य सरकारने वाईन विक्रीबाबतचा निर्णयावरुन वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर वावगं ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले, काही लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. पण गेल्या २ ते ३ वर्षांपासूनच प्रतिवर्षी इतक्या नोकऱ्या देण्याचे सांगितले जाते, मात्र त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. सर्वसामान्य माणसाला ज्या दैनंदिन जीवनात वस्तू लागतात, त्याच्या किंमती नियंत्रण ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी तरतूद असायला हवी, मात्र यातील एकाही गोष्टीची पूर्तता बजेटमध्ये झालेली दिसत नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. ते बारामतीमधून बोलत होते.
Share your comments