1. बातम्या

निसर्गमित्र चौगुलेंची किमया; नागरिकांच्या परसदारी पिकल्या रानभाज्या

KJ Staff
KJ Staff


दरवर्षी पावसाळ्यात पश्चिम घाटातील डोंगर, पठारावर रानभाज्या पिकतात. पूर्वी त्यांचा आदिवासी, शेतकऱ्यांच्या आहारात वापर व्हायचा. पण कालौघात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. आजकाल तर अनेक रानभाज्यांची माहिती नागरिकांनाही नाही. मात्र, आपल्या दैनंदिन आहारात जीवनसत्त्वे पुरविणाऱ्या रानभाज्यांची माहती आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्याचा उपक्रम कोल्हापूर येथील निसर्गमित्र संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते, पर्यावरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अनिल चौगुले यांनी राबवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे २५० नागरिकांच्या परसदारी रानभाज्या पिकल्या आहेत. 

महाराष्ट्रात जवळपास २७५ प्रकारच्या रानभाज्या आढळतात. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या परिसरात ९० प्रकारच्या रानभाज्या आढळतात. त्यात प्रामुख्याने शेवगा, केणा, आघाडा, गुळवेल, अळू, गोकर्ण, ओवा, कुर्डू, मायाळ, कांडवेल, तेरडा, केना, घोळी, अंबुशी, हादगा, काटेमाठ, रानमोहोर, फांजिरा, भारंगी, मोरशेंड, टाकाळा, पाथरी अशा अनेक रानभाज्यांचा समावेश आहे.

दर पावसाळ्यात डोंगर पठारावर या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवून येतात. त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासह मुळव्याध, किडनी स्टोन, अशा आजारांवरही या रानभाज्या गुणकारी आहेत. जून ते ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या रानभाज्यांचा वापर जंगल परिसरातील आदिवासी, शेतकरी नेहमीच्या आहारात उपयोग करतात. मात्र, शहरी नागरिकांचे आणि आता नेहमीच्या शेतात पिकणाऱ्या भाजीपाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होते.

पर्यावरण प्रेमी अनिल चौगुले हे निसर्गमित्र संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करतात. वृक्ष प्राधिकरण, जैव विविधता मंडळ, जिल्हा पर्यावरण समिती अशा विविध स्तरावर चौगुले गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. गणेशोत्सवात निर्माल्यदान, गणेश मूर्तीदान, बिया संकलन, नैसर्गिक रंगांपासून रंगपंचमी खेळण्यासाठी जागृती, रानभाज्या, देवराईचा अभ्यास, खतनिर्मिती, सौरऊर्जा साधनेनिर्मिती अशा अनेक पर्यावरणपूरक कामात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. २०१० पासून रानभाज्यांची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यासह त्यांची माहिती संकित करणे, त्याविषयीचे प्रदर्शन, विविध रेसिपींच्या माध्यमातून रानभाज्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. रानभाज्यांच्या महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने घरच्या घरी रानभाज्या पिकवून नागरिकांनी त्या खावून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी असे आवाहन चौगुले यांनी केले होते.

 


रानभाज्यांमधील औषधी गुणधर्म ओळखून त्यांनी या भाज्या परसदारी कशा पिकवता येतील, त्यांचा नेहमीच्या आहारात कसा उपयोग होईल याविषयी संशोधन केले. माहिती संकलन केले. त्यातून राजिगरा, गुळवेल, वाळवरणा, मायाळू, आंबुशी, तेरडा, आंबाडी, मोह, गोकर्ण, भोकर अशा विविध  ३० रानभाज्यांची त्यांनी निवड केली. रानभाज्यांविषयी माहिती देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करून त्यात सहभागी होणाऱ्या सदस्यांना बियाणे वाटून दिले. प्रत्येकाने ५० ते १०० रोपे तयार केली. परसदारी तयार केलेली ही रोपे परस्परांमध्ये वाटून देण्यात आली. प्रत्येकाने रानभाज्यांनी परसबाग फुलवली. रानभाज्यांचे संवर्धन व्हावे अशी अपेक्षा चौगुले यांची आहे. मात्र, त्यांचा व्यावसायिक भाजीपाल्यासारखा वापर होऊ नये याची दक्षता ते घेतात.

यासंदर्भात अनिल चौगुले सांगतात, ‘शेतकरी असो वा शहरातील नागरिक, प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर रानभाज्या पिकवाव्यात आणि त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर शहरासह कागल तालुक्यातील जैताळ गावातील दीडशे कुटूंबांना या उपक्रमाला जोडून घेतले. त्यांना गुळवेल, गोकर्ण, मायाळ, राजिगरा आदी भाज्यांचे बियाणे दिले. या सर्व कुटूंबांनी रानभाज्या पिकवल्या आहेत. याशिवाय कोल्हापूर शहरातही अडीचशे नागरिकांनी छोट्या कुंड्यांमध्ये, टेरेसवर भाज्या पिकवल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात मोहोर, वाघाटी, गोमाटी, करंदी, केणा, आघाडा, कुर्डू, माठ अशा भाज्या पक्व होतात. त्या-त्या ऋतुमध्ये उगवणाऱ्या भाज्यांची ओळख पुसली जाऊ नये यासाठी हे उपक्रम सुरू आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रानभाज्यांच्या  फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोना विषाणू महामारीच्या धास्तीने लॉकडाउन लागू होते. त्यामुळे नागरिकांनी घरच्या घरी भाज्या पिकवून रानाभाज्यांचा महोत्सव साजरा केला. पुढील वर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न आहेत.’  

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters