निसर्ग चक्रीवादळने आपले रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे वादळ धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत.
दरम्यान निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालं आहे. परंतु पुढील सहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. महाराष्ट्रातील 21 आणि गुजरातच्या 16 जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांत एनडीआरएफने एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
वादळाचा परीघापैकी काही भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून किमान एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे. पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
चक्रीवादळ वेगाने ताशी 55 किमी वेगाने मुंबईच्या दिशेन सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाहीय. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे.
निसर्ग वादळामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर लावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटी सुटण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा बोटी बांधाव्या लागत आहेत. तसेच कच्च्या घरातील लोकांना पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय साधून इतरत्र स्थलांतरित करत आहेत.
Share your comments