ठाणे : खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकऱ्यांनी भातपिकांचा विमा काढलेला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन दिवसांपूर्वी ९ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. याविषयीची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकृश माने यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पूरस्थितीच्या कालावधीत बहुतांशी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली होती. काही ठिकाणी शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. याशिवाय कर्जमाफीच्या विषयामुळेही येथील शेतकरी चर्चेत होते. अवेळी पाऊस आणि पडणारा रोग यापासून त्यांचे नुकसान होऊ नये, यावरील उपाय योजना म्हणून शेतकऱ्यांवर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यास अनुसरुन जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकऱ्यांनी त्यांच्या ८ हजार ५८० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचा विमा काढलेला आहे.
या पीकाचे विविध कारणानी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु पीक विम्याचा पैसा आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. यंदाच्या साडे आठ हेक्टरवरील भात पिकांच्या विम्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्ती करून विमा काढण्यास सांगितले. तर काही शेतकऱ्यांना नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करुन भात पिकाचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले.
Share your comments