देशात सध्या सर्वत्र तापमानात मोठी वाढ नमूद करण्यात येत आहे. उत्तर भारतात सध्या पारा कमालीचा वाढत आहे, असे असतानाच आता उत्तर भारतात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळू शकते. भारतीय हवामान खात्याने याबाबत नुकतीच एक माहिती प्रकाशित केली आहे. मध्यंतरी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, गारपीट, धुक्याचे वातावरण, ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन असे मिश्र वातावरण बघायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा बघायला मिळू शकतो. हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात आगामी काही दिवसात पावसाची शक्यता आहे त्यासाठी वातावरणात आतापासूनच मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने, पुढील तीन दिवस उत्तर भारतात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो असे संकेत दिले आहेत. उत्तर भारतासमवेतच उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज या वेळी वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे. येत्या 24 तासात पंजाब उत्तर प्रदेश बिहार तसेच हरियाणातील काही भागात पावसाची शक्यता आहे, अवकाळी पावसासमवेतच काही भागात गारपीट होण्याची देखील आशंका वर्तवली गेली आहे.
27 फेब्रुवारीला या भागात चक्रीवादळ येण्याची देखील शक्यता नाकारता येणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची धाकधुक बघायला मिळत आहे. याआधी अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला असताना अवकाळी पावसाचे हे नवीन संकट शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढील 24 तासात पावसाचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच अंदमान व निकोबार या बेटावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाची देखील शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ताशी पन्नास किलोमीटर वादळी वारे या वेळी वाहू शकतात.
याचा परिणाम महाराष्ट्रात एवढा बघायला मिळणार नाही मात्र राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण नमूद केले जाऊ शकते. राज्यातील कोकणातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परंतु राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नाही, या काळात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सर्वत्र दिवसा कडक ऊन पडत असून रात्री मात्र वातावरण थंड होते. एकंदरीत बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला कुठलाच धोका नाही. त्यामुळे राज्यातील बळीराजा सुटकेचा मोकळा श्वास सोडला एवढं नक्की.
Share your comments