नाशिक: शेतकऱ्यांनी उन्नत शेतीसाठी जगातील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि त्यासाठी आवश्यक शिक्षण-प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृह येथे आमची माती आमची माणस कृषी मासिकातर्फे आयोजित कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, मंगेश देशमुख, प्रा. संजय जाधव, जयराम पुरकर, सदूभाऊ शेळके आदी उपस्थित होते.
श्री. जानकर म्हणाले, शेती व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी कौशल्य, संशोधन, सिंचन, बियाणे आणि खते, शीतगृहाची व्यवस्था, विपणन प्रक्रियेचे ज्ञान आणि नवे तंत्रज्ञान आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतीविषयी योग्य माहिती प्राप्त करून आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळायला हवे. त्यासाठी मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, चारायुक्त शिवार अशा विविध चांगल्या योजना राबविल्या आहेत. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे चार लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. शासनाने विपणन साखळीतील मध्यस्थ टाळण्यासाठी व शेतकऱ्याच्या फायद्यासाठी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार योजना सुरू केली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आठवडे बाजाराला जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागासाठीच्या तरतुदीत भरीव वाढ करून ही तरतूद 18 हजार कोटींपर्यंत नेली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुखांचे कृषी क्षेत्रातील कार्य पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे श्री. जानकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलात क्षमता असून त्याला शिक्षणाची जोड देऊन विविध क्षेत्रात यश मिळावावे, असे आवाहन त्यांनी केले.
Share your comments