देशातील नव्या ऊस गाळप हंगामास सुरुवात

Thursday, 07 November 2019 04:44 PM


नवी दिल्ली:
देशातील नव्या गाळप हंगामास सुरुवात झाली असून आजतागायत एकूण 28 कारखान्यातून 14.50 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 8.67 टक्के उताऱ्याने 1.25 लाख टन नव्या साखरेचे उत्पादन झाले आहे, यंदाच्या गाळप हंगामात उत्तर प्रदेश व कर्नाटक राज्यांनी आघाडी घेतली आहे. कर्नाटक राज्यातील 9 कारखान्यांनी 6.67 लाख टन ऊसाचे गाळप केले असून त्यातून सरासरी 9 टक्के उताऱ्याने 60 हजार टन नवे साखर उत्पादन केले आहे.

त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 13 कारखान्यातून 1.88 लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी 8 टक्के उताऱ्याने 15 हजार टन नवे साखर उत्पादन झाले आहे. दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील 6 कारखान्यात 5.88 लाख टन ऊस गाळप झाले असून सरासरी 8.50 टक्के उताऱ्याने 50 हजार टन नवे साखर उत्पादन तयार झाले आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्ररकाद्वारे सांगण्यात आले आहे.

वास्तविकतः 1 ऑक्टोबर 2019 रोजी सुरु झालेल्या नवीन साखर वर्षातील ऊस गाळपाची सुरुवात महाराष्ट्रातून होणे अपेक्षित होते मात्र परतीच्या पावसाने प्रमुख ऊस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामधून जो तडाखा दिला आहे त्यामुळे रानातील ओलावा संपेपर्यंत राज्यातील ऊस तोड होवू शकत नसल्याने महाराष्ट्राचा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या 3/4 थ्या आठ्वड्यापासून सुरु होण्याची चिन्हे आहेत. गुजरात, कर्नाटक व इतर राज्यातील गाळप हंगाम देखील नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण जोमाने सुरु होईल असा सध्याचा कयास आहे.

"एकूण उत्पादनाखालील क्षेत्रामध्ये झालेली घट व त्यासोबत ऊस उत्पादनामध्ये होणारी घट लक्षात घेता हंगाम अखेर देशातील नवे साखर उत्पादन 260 ते 265 लाख टन इतपत मर्यादित होईल जे गतवर्षीच्या विक्रमी 331 लाख टन साखर उत्पादनापेक्षा सुमारे 70 लाख टनाने कमी असण्याचा अंदाज आहे" असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

"गेल्या दोन वर्षाच्या विक्रमी साखर उत्पादनानंतर यंदाच्या वर्षीचे अपेक्षित असणारे साखर उत्पादन, इथेनॉल निर्मितीच्या वाढीव क्षमतेमुळे तिकडे होणारा साखर वापर तसेच विक्रमी 60 लाख टन होणारी साखर निर्यात यांच्या परिणामस्वरूप देशातील कारखानास्तरावरील साखर विक्रीच्या दरात संतुलन राहील जेणेकरून साखर कारखान्याच्या स्तरावरील आर्थिक परिस्थिती सुधारेल," असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला.  

Sugarcane Crushing ऊस गाळप Dilip Walse Patil दिलीप वळसे पाटील national federation of cooperative sugar factories राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
English Summary: New sugarcane crushing season started in the country

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.