मुंबई: शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कृषी संवाद’ या मदत कक्षाद्वारे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी एकाचवेळी जवळपास 1 हजार 800 कृषी सहाय्यक, शेतकरी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी ऑडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधून कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. मंत्रालयात कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळमधील कृषी सहाय्यक, शेतकरी, जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
डॉ. बोंडे म्हणाले, मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेत 80 टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 93 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून माहिती पडताळणीचे काम सुरू आहे. तसेच पडताळणी पूर्ण झालेल्या 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हफ्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या वृद्धावस्थेत त्यांना सन्मानजनक आयुष्य जगता यावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून यामध्ये शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामानावर आधारित फळपिक विमा योजना याकरिता दक्षता समिती नेमण्यात आली असून या कंपन्याचे प्रतिनिधी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात व तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध आहेत. शेतीचे नुकसान झाल्यास तत्काळ तालुका कृषी अधिकाऱ्याला कळविण्यात यावे. कर्जमाफीसाठी 43 लाख शेतकऱ्यांच्या नावांची नोंदणी झाली असून जर कोणत्या शेतकऱ्याचे नाव या यादीत नसेल तर त्यांनी तालुका सहाय्यक उपनिबंधकाकडे संपर्क करावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.
शेतमाल थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांकडे पोहोचविण्यासाठी लवकरच एक योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकांवर जास्त भर देण्यात येणार असल्याचेही डॉ. बोंडे यांनी सांगितले.
Share your comments