नवी दिल्ली- आगामी पाच वर्षात देशात तीन लाख प्राथमिक सहकारी संस्था (पीएसी) स्थापना करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री अमित शाह यांनी केली. राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित करताना शाह बोलत होते. कालबाह्य सहकरी कायदे बदलून देशाच्या नव्या सहकार धोरणाची निर्मिती केली जाणार असल्याचे सूतोवाच शाह यांनी केले.
सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच देशव्यापी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच देशभरातील सहकारी संस्थांना संबोधित केले. इफ्को, सहकार भारती, नाफेड, कृभको आदी देशभरातील संस्थांनी सहकार संमेलनाच्या आयोजनात भूमिका बजावली आहे. देशभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी संमेलनास उपस्थित होते.
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांशी सहकार्याने वागले जाईल, संघर्षाची भूमिका टाळण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. तसेच संघराज्य संबंधाच्या समन्वयातून सहकारचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
व्याप्ती सहकाराची:
सहकार क्षेत्राची उपयुक्तता आजही अधिक आहे. भारतातील 51 टक्के गावांमध्ये सहकारी संस्था कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची संख्या 8 लाख 55 हजार आहे. देशात 17 मोठ्या आणि जिल्हास्तरावर 300 छोट्या सहकारी बँका काम करीत आहेत. या बँका शेतकर्यांना 29 टक्के कर्ज आणि 35 टक्के खतांचे वितरण करत आहे.
Share your comments