1. बातम्या

नेदरलँडच्या ‘एफएमओ’ बँकेचा सह्याद्री फार्म्सला 120 कोटींचा वित्तपुरवठा

नाशिक: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास योग्य मार्गाने केला तर काय घडू शकते याची प्रचिती देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला आली आहे. ‘एफएमओ बँक (नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुमारे 120 कोटींचा (15 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्त पुरवठा करणार आहे. एफएमओ बँकेच्या तत्त्वांनुसार अशा प्रकारचा वित्तपुरवठा करण्यामागे व्यापक सामाजिक हित पाहिले जाते. त्याला ‘सोशल इम्पॅक्ट फंड’ म्हटले जाते.

KJ Staff
KJ Staff


नाशिक:
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास योग्य मार्गाने केला तर काय घडू शकते याची प्रचिती देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला आली आहे. ‘एफएमओ बँक (नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुमारे 120 कोटींचा (15 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्त पुरवठा करणार आहे. एफएमओ बँकेच्या तत्त्वांनुसार अशा प्रकारचा वित्तपुरवठा करण्यामागे व्यापक सामाजिक हित पाहिले जाते. त्याला ‘सोशल इम्पॅक्ट फंड’ म्हटले जाते.

‘एफएमओ’ने सह्याद्रीला केलेला हा आर्थिक पुरवठा सह्याद्री कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कारण एक मजबूत व शाश्‍वत मूल्यसाखळी (व्हॅल्यू चेन) निर्माण करण्यासाठी भारतीय शेतीत अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. ज्याची गरज संपूर्ण देशातील कृषिक्षेत्राला आहे. 

सह्याद्रीला देऊ केलेल्या प्रस्तावित कर्ज स्वरूपातील वित्तपुरवठ्याचा निर्णय जाहीर करताना ‘एफएमओ’ने म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे कृषी आणि कृषीप्रक्रिया कार्याला चालना मिळून शेतमालाची नासाडी थांबू शकेल. सह्याद्री कंपनीने कृषी इनपूट आणि आणि उत्पादित कृषीमालाच्या मार्केटिंगसाठी प्रभावी व्यासपीठ तयार केले आहे. ज्यामुळे शेतकरी कंपन्या कृषी उत्पादनात आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतील. भारतातील छोट्या व सीमान्त शेतकर्‍यांना शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या कृषीमालास अधिक चांगले मूल्य मिळेल. ज्यायोगे त्यांचे उत्पन्न वाढून दारिद्य्र दूर होण्यास हातभार लागू शकेल.

कृषीमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये कृषिमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी हा वित्तपुरवठा गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे ‘एफएमओ’ने स्पष्टे आहे. हा प्रस्ताव अमलात आणण्यासाठी दिल्लीतील अल्पेन कॅपिटल या सल्लागार कंपनीने सह्याद्रीला सहाय्य केले. 

‘एफएमओ’च्या ग्लोबल हेड (कृषी व्यवसाय) श्रीमती पीटरनल बोगार्ड यांच्या नेतृत्वाखाली स्टीव्हन डुव्हरमन (आशिया हेड, एफएमओ, कृषी व्यवसाय), विम विएंक (प्रिन्सिपल सल्लागार, एफएमओ) या अधिकार्‍यांनी मे 2019 मध्ये सह्याद्री कंपनीला भेट देऊन संपूर्ण कार्यपद्धती समजावून घेतली होती. या टीमने सह्याद्रीशी संलग्न प्रातिनिधिक शेतकर्‍यांशी त्यांच्या गावी जाऊन थेट संवाद साधला होता. सह्याद्रीने त्यांना पुरवलेले उत्पादन तंत्र, अन्न सुरक्षेच्या पद्धती, ग्लोबल गॅप तंत्रानुसार उत्पादनतंत्र, सह्याद्रीशी संलग्न झाल्यानंतर शेतकर्‍यांवर झालेला दृश्य परिणाम, बदललेली आर्थिक परिस्थिती, द्राक्षे आणि अन्य पीक लागवड पद्धतीत झालेले बदल, द्राक्षांची निर्यातक्षम नवीन वाणं, उत्पादन व उत्पन्नात पडलेला फरक, बदललेली जीवनशैली आदी अनुभव त्यांनी शेतकर्‍यांच्या तोंडून ऐकले होते. 

छोट्या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणे बँकांसाठी धोक्याचे (रिस्क) वाटते. विखुरलेले शेतकरी दिशाहीन असतात. प्रत्येक बाबतीत ते कशावर अवलंबून असतात. काही विपरीत घडले तर त्यांची शेती कोलमडून पडते. सह्याद्रीने छोट्या शेतकर्‍यांना एकत्र करून केवळ बँकाच नव्हे तर देशभरातील शेतकर्‍यांपुढे एक आदर्श मॉडेल ठेवले आहे. भविष्याचे भान, आकांक्षा आणि क्षमता यांचा तुम्ही पुरेपूर वापर केला आहे. सह्याद्रीसारख्या मॉडेलशी संलग्न राहिलात तर तुमच्या व्यवसायातील धोके कमी होतील. यामुळे बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्जपुरवठा करण्यातील धोकेही कमी होतील, अशा शब्दांत स्टीव्हन डुव्हरमन यांनी सह्याद्रीचे कौतुक केले होते. 


एफएमओ बँकेबद्दल...

एफएमओ ही नेदरलँड्स (हॉलंड) सरकारच्या मालकीचा उपक्रम असून ‘डच उद्योजकता विकास बँक’ अशीही या बँकेची ओळख आहे. या बँकेचा दर्जा जागतिक बँकेच्या तोडीचा असून बँकेचे मुख्यालय हेग शहरात आहे. कृषी उद्योग, ऊर्जा, वित्तीय संस्था, अन्न आणि जलसिंचन, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि सेवा आदी क्षेत्रांसाठी या बँकेतर्फे इक्विटी आणि कर्ज या माध्यमातून गुंतवणुकीद्वारे प्रकल्पांना वित्तपुरवठा केला जातो. आफ्रिका खंडातील देश व आशियातील विकसनशील देशांमध्ये ही बँक प्रामुख्याने गुंतवणूक करते. एफएमओ बँकेच्या तत्त्वांनुसार अशा प्रकारचा वित्तपुरवठा करण्यामागे व्यापक सामाजिक हित पाहिले जाते. अशा प्रकारची आर्थिक पुरवठा ‘सोशल इम्पॅक्ट फंड’ स्वरूपात असतो. जगातील सर्वांत आव्हानात्मक व्यवसायासांठी ही बँक प्रामुख्याने कर्जपुरवठा करते. आशिया खंडात विशेषतः भारतात शेती हा व्यवसाय त्या प्रकारात गणला जातो. 

सह्याद्रीच्या माध्यमातून प्रगती

सह्याद्रीशी संलग्न असलेले सर्व शेतकरी चांगली प्रगती करत आहेत. सह्याद्रीच्या माध्यमातून या क्लस्टरमध्ये झालेल्या छोट्या शेतकर्‍यांच्या प्रगतीला अनेक पदर आहेत. त्याचे चांगले परिणाम आम्हाला अनेक रूपांनी आम्हाला दृष्टीला पडले. सह्याद्रीने द्राक्ष उत्पादकांसोबतच अन्य पिके घेणार्‍या अधिकाधिक शेतकर्‍यांना सोबत जोडून घ्यावे, त्यांना सह्याद्रीचा हिस्सा बनवावे. हा परिवार त्यामुळे विशाल होण्यास मदत होईल. अधिक चांगली उत्पादने घेऊन ती तुम्ही निर्यात करा आणि स्वतःच्या देशातील बाजारपेठेतही पाठवा.
-श्रीमती पीटरनल बोगार्ड (ग्लोबल हेड, ‘एफएमओ’ अ‍ॅग्री बिझनेस)

शेतकरी कंपन्यांसाठी आश्‍वासक घटना

‘एफएमओ’ने भारतातील शेतकरी उत्पादक कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे, ही घटना केवळ सह्याद्री फार्म्स नव्हे तर देशातील एकूण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी आश्‍वासक व अभिमानास्पद मानली पाहिजे. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून एकत्र येऊन छोट्या व सीमान्त शेतकर्‍यांची एकत्रित ताकद निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. हे साध्य केल्यावर योग्य मार्केट, तंत्रज्ञान आणि भांडवलाची निर्मिती हे घटक शेतीसाठी मिळवणे सोपे जाते. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून तोट्यातील शेतीचे चित्र बदलू शकतो. शेतीकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन शेतकर्‍यांना मिळू शकतो. भारतीय शेतीचे अनोखे मॉडेल जगाला दाखविण्याची ताकद शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आहे. शेतकरी कंपन्यांनी ‘सीड टू प्लेट’ या पद्धतीने काम केले तर भारतीय शेतीला उज्ज्वल भवितव्य आहे.
-श्री. विलास शिंदे (चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स कंपनी)

English Summary: Netherlands 'FMO' Bank financed Rs 120 crore to Sahyadri Farms Published on: 19 September 2019, 07:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters